‘बनी बेगम बाग’ला गतवैभव प्राप्त होणार

By Admin | Updated: August 20, 2014 00:57 IST2014-08-20T00:37:10+5:302014-08-20T00:57:25+5:30

मुजीब देवणीकर, औरंगाबाद खुलताबादेतील बनी बेगम बागला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्रीय साह्यता निधीतून तब्बल १ कोटी ५६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.

'Bani Begum Bagh' will get the good fortune | ‘बनी बेगम बाग’ला गतवैभव प्राप्त होणार

‘बनी बेगम बाग’ला गतवैभव प्राप्त होणार

मुजीब देवणीकर, औरंगाबाद
ऐतिहासिक औरंगाबाद शहरापासून अवघ्या २३ कि. मी. अंतरावर असलेल्या खुलताबादेतील बनी बेगम बागला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्रीय साह्यता निधीतून तब्बल १ कोटी ५६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. या निधीतून राज्य पुरातत्व विभागातर्फे संपूर्ण उद्यानाचा कायापालट करण्यात येणार आहे.
मागील दोन दशकांपासून बनी बेगम उद्यानाची डागडुजी करावी, पर्यटकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जागतिक पातळीवर या उद्यानाची जनजागृती करावी, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, राज्य पुरातत्व विभाग आणि एमटीडीसी या कामात पुढाकार घ्यायला तयार नव्हती. २०१० मध्ये उद्यानाच्या डागडुजीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. २०११ मध्ये हा निधी मंजूर झाला. मात्र विविध कारणांमुळे हा निधी प्राप्त होत नव्हता. २०१४ मध्ये प्रत्यक्ष निधी प्राप्त झाला आहे.
एमटीडीसीकडे हा निधी आला असून, त्यातील ३२ लाख रुपयांचा पहिला हप्ता राज्य पुरातत्व विभागाला वर्ग करण्यात आला असल्याची माहिती एमटीडीसीचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक पांडुरंग कुलकर्णी यांनी दिली. उद्यानाचा कायापालट चांगला आणि दर्जेदार पद्धतीने व्हावा या दृष्टीने हे काम राज्य पुरातत्व विभागाकडे सोपविण्यात आले आहे.
ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित
मुगल शासक औरंगजेब यांचा नातू बेदार बख्त यांची पत्नी बनी बेगम ऊर्फ जहाँ बानो यांची कबर उद्यानात आहे. मुगल साम्राज्यातील एक देखणा आणि वास्तुकलेचा सुंदर नमुना म्हणून या बागेकडे पाहिल्या जाते. मागील अनेक वर्षांपासून ही बाग दुर्लक्षित होती. बागेत एकही पर्यटक फिरकत नाही. खुलताबादेतील विविध पर्यटक व धार्मिक स्थळांचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाने या शहराला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. या शहरात दररोज शेकडो पर्यटक आणि भाविक येतात. मात्र, शासनाने शहरात पर्यटकांसाठी कोणत्याही मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत.

Web Title: 'Bani Begum Bagh' will get the good fortune