२२ टँकरसह अधिग्रहणेही बंद
By Admin | Updated: September 5, 2014 00:56 IST2014-09-05T00:46:35+5:302014-09-05T00:56:16+5:30
कळंब : भर पावसाळ्यातही पावसाचा पत्ता नसल्याने तालुक्यातील जवळपास ६४ गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमी-अधिक स्वरूपात निर्माण झाला होता

२२ टँकरसह अधिग्रहणेही बंद
कळंब : भर पावसाळ्यातही पावसाचा पत्ता नसल्याने तालुक्यातील जवळपास ६४ गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमी-अधिक स्वरूपात निर्माण झाला होता. मात्र, मागील पंधरवड्यात वरूणराजा बरसल्याने प्रशासनासोबतच नागरिकांचीही चिंता कमी झाली असून, २२ टँकरसह ११८ अधिग्रहणेही बंद झाली आहेत.
तालुक्यात जून, जुलै महिन्यात पावसाने मोठी निराशा केली. उन्हाळ्यात खालावलेल्या पाणी पातळीत अर्धा पावसाळा संपूनही पाऊन न आल्याने किंचितही वाढ झाली नाही. मात्र, २० आॅगस्टपासून तालुक्यात मघा नक्षत्राचे दमदार आगमन झाले. समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नदीपात्रात पाणी आले होते. येरमाळा, चोराखळी, मलकापूर, कोठाळवाडी साठवण तलाव वगळता इतर आडसूळवाडी, भाटसांगवी, ढोराळा, शिराढोण, रायगव्हाण, देवधानोरा या तलावात पाणीसाठा वाढला नसला तरी टंचाई मात्र निश्चितच कमी झाली आहे.
मोहा, गंभीरवाडीसह अठरा गावांतील २२ टँकर २९ आॅगस्टपासून तर ३१ आॅगस्टपासून ६४ गावांतील ११८ अधिग्रहणेही बंद करण्यात आली आहेत. प्रशासनाचा पाण्यावर होणारा लाखो रूपयानचा खर्च यामुळे थांबला असून, आगामी काळात दमदार पाऊन नाही झाल्यास मात्र पुन्हा पाणीप्रश्न निर्माण होऊ शकतो. (वार्ताहर)