दहा हजारांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार जाळ्यात

By Admin | Updated: November 17, 2015 00:32 IST2015-11-16T23:44:26+5:302015-11-17T00:32:18+5:30

बीड : निलंबित तलाठ्याविरूध्द सुरू असलेल्या चौकशीमध्ये सकारात्मक अहवाल देण्यासाठी व निलंबन कालावधी नियमित करण्यासाठी संबंधित तलाठ्याकडून

Accepting a bribe of ten thousand nab tehsiladar jaap | दहा हजारांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार जाळ्यात

दहा हजारांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार जाळ्यात


बीड : निलंबित तलाठ्याविरूध्द सुरू असलेल्या चौकशीमध्ये सकारात्मक अहवाल देण्यासाठी व निलंबन कालावधी नियमित करण्यासाठी संबंधित तलाठ्याकडून दहा हजार रुपये मागितले होते. ही लाच स्वीकारताना अंबाजोगाई येथील नायब तहसीलदार शशीकुमार बाबूराव पंडित यास बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी रंगेहात पकडले.
तक्रारदार सचिन केंद्रे हे तलाठी असून २०१३ पासून ते निलंबित होते. फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांना नोकरीवर परत रुजू करून घेण्यात आले होते. निलंबन काळातील चौकशीचा अहवाल सकारात्मकपणे देण्यासाठी नायब तहसीलदार शशिकुमार पंडित यांनी तलाठी केंद्रे यांच्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाच देण्याची इच्छा केंद्रे यांची नव्हती. त्यामुळे त्यांनी सोमवारी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात पंडित यांच्याविरूध्द तक्रार दाखल केली. त्यानंतर अंबाजोगाई येथील उपविभागीय कार्यालयात पंचांसमक्ष पंडित यांनी केंद्रे यांच्याकडे दहा हजार रूपयांची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले. लाच स्वीकारताना पंडित यांना एसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले.
या प्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई उपअधीक्षक अरूण देवकर, पो. नि. भाऊसाहेब गोंदकर, पो. हे. काँ. श्रीराम खटावकर, राकेश ठाकूर, सुशांत सुतळे, कल्याण राठोड, सय्यद नदीम यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Accepting a bribe of ten thousand nab tehsiladar jaap