विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 09:47 IST2026-04-23T09:45:12+5:302026-04-23T09:47:22+5:30
मोबाइल, व्हिडीओ गेम्सच्या वापरानं तरुणाईच्या मेंदूची कार्यक्षमता कमी होत असल्याचे निष्कर्ष अलीकडच्या काळात तज्ज्ञांनी जाहीर केले असले तरी त्याचा वापर अजूनही फारसा कमी झालेला नाही. जर्मनीतील लाइपझिग या शहरात तर गेमिंगचा सर्वांत मोठा महाकुंभ भरवला जातो.

विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
मोबाइल, व्हिडीओ गेम्सच्या वापरानं तरुणाईच्या मेंदूची कार्यक्षमता कमी होत असल्याचे निष्कर्ष अलीकडच्या काळात तज्ज्ञांनी जाहीर केले असले तरी त्याचा वापर अजूनही फारसा कमी झालेला नाही. जर्मनीतील लाइपझिग या शहरात तर गेमिंगचा सर्वांत मोठा महाकुंभ भरवला जातो. आताही तिथे नुकताच ‘Caggtus 2026’ हा गेमिंग फेस्टिव्हल भरवण्यात आला होता. या फेस्टिव्हलचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ‘लॅन पार्टी’ ! या पार्टीत अक्षरश: हजारो गेमर्स त्यांचे स्वतःचे संगणक घेऊन येतात आणि सलग ७० तास एकमेकांविरुद्ध गेम्स खेळतात. या इव्हेंटदरम्यान गेमर्स इथेच राहतात, इथेच खातात-पितात आणि झोपतातही. यावर्षी पहिल्यांदाच १८ वर्षांवरील वयोगटासाठी खास ‘Lvl 18 एरिया’ तयार करण्यात आला होता.
यंदाचा फेस्टिव्हल सुमारे ४०,००० चौरस मीटरमध्ये पसरलेल्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. गेमिंग, तंत्रज्ञान आणि कम्युनिटीशी संबंधित २१०० गेमर्स आपल्या संगणक सेटअपसह येथे जमले होते. याशिवाय ५,००० चौरस मीटरमध्ये पसरलेल्या टेबलटॉप आणि कार्ड गेम्स झोनसोबतच कॉस प्ले स्पर्धा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि फ्री-प्ले स्टेशननंही प्रेक्षकांना आकर्षित केलं. या संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात १२ वर्षांवरील मुलं सहभागी होऊ शकतात, तर ७० तास चालणाऱ्या मुख्य लॅन पार्टीसाठी किमान वय १८ वर्ष निश्चित करण्यात आलं आहे.
अर्थात, या गेमिंग फेस्टिव्हलमध्ये सर्वच जण सलग ७० तास गेम खेळतात असं नाही. प्रत्येक जण आपापल्या क्षमतेप्रमाणे त्यात सहभागी होतो. काही जण २४ तास, काही जण सलग ४८ तास किंवा त्याहून जास्त काळ गेमिंगचा ‘आनंद’ लुटतात. सलग ७० तास गेम खेळणारेही काही जण येथे असतात.तरुणाईच्या दृष्टीनं इथलं वातावरणच इतकं उत्साही आणि गुंतवून ठेवणारं असतं की अनेक तरुण झोपेचा त्याग करून जास्तीत जास्त वेळ गेमिंग, स्पर्धा आणि मित्रांसोबत घालवतात. काही इव्हेंट्समध्ये सहभागींसाठी खास ‘स्लिपिंग झोन्स’ किंवा विश्रांती क्षेत्र ठेवली जातात. अनेक जण स्लिपिंग बॅग घेऊन येतात आणि थोड्या वेळासाठी तिथेच झोप घेतात, पुन्हा उठून गेममध्ये सहभागी होतात.
या महाकुंभाचं आणखी एक आकर्षण म्हणजे ‘कम्युनिटी फील’. हजारो गेमर्स एकाच ठिकाणी एकत्र येतात, रात्री उशिरापर्यंत चर्चा, स्पर्धा, आणि टीम गेम्स चालतात. त्यामुळे हा अनुभव फक्त गेम खेळण्यापुरता मर्यादित राहत नाही, तर तो एक सामाजिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक उत्सव बनतो.
डिजिटल एंटरटेन्मेंट, ई-स्पोर्ट्स, व्हर्च्युअल रिॲलिटी आणि नवीन तंत्रज्ञान यांचा संगम घडवणारा हा उत्सव अलीकडच्या काळात तरुणाईसाठी विशेष आकर्षण ठरतो आहे. त्यामुळेच गेमिंग हे केवळ मनोरंजन नसून एक करिअर, स्पर्धात्मक क्षेत्र आणि एका मोठा उद्योगाचा भाग असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ई-स्पोर्ट्स स्पर्धा हादेखील या कार्यक्रमाचा मुख्य भाग असतो, ज्यामध्ये जगभरातील व्यावसायिक गेमर्स सहभागी होतात. व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) आणि ऑगमेंटेड रिॲलिटीचा (AR) अनुभव तरुणांसाठी विशेष आकर्षण असतो, कारण येथे भविष्यकालीन गेमिंगचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.