रिक्षाचालकाची मुजोरी, वाहतूक पोलिसाच्या अंगावर रिक्षा घालत २० फूट फरफटले, प्रवासीही पडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 12:25 IST2025-11-24T12:24:08+5:302025-11-24T12:25:01+5:30
पोलिस अंमलदार गंभीर जखमी; छत्रपती संभाजीनगरमधील महावीर चौकातील धक्कादायक घटना

रिक्षाचालकाची मुजोरी, वाहतूक पोलिसाच्या अंगावर रिक्षा घालत २० फूट फरफटले, प्रवासीही पडला
छत्रपती संभाजीनगर : महावीर चौकात वाहतुकीचे नियमन करीत असलेल्या अंमलदारावर एका बेजबाबदार रिक्षाचालकाने रिक्षा घातली. पोलिस अंमलदार तुकाराम टाकसाळे हे या धडकेत खाली कोसळले. चालक एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने अंमलदार टाकसाळे रिक्षाखाली अडकल्याचे लक्षात येऊनही त्यांना २० फुटांपर्यंत फरफटत नेले. ही घटना रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. तुकाराम टाकसाळे सध्या सिग्मा रुग्णालयात आयसीयुत दाखल आहेत. रिक्षाचालक आरोपीच्या विरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
युसूफ मोहंमद अली अन्सारी (२७, रा. मोमीनपुरा मशिदीजवळ, दौलताबाद) असे रिक्षा चालकाचे नाव असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन मिरधे यांनी दिली. शहरात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू होती. महावीर चौकातही चार रस्त्यांना चार पोलिस अंमलदार उभे करून छावणी वाहतूक शाखेचे पोलिस कारवाई करीत होते.
विनागणवेश असल्याने थांबविण्याचा केला प्रयत्न
महावीर चौकातून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभे असलेले अंमलदार तुकाराम टाकसाळे यांना एक चालक विनागणवेश रिक्षा (एमएच २०-ईके ४६३२) चालवित असल्याचे दिसले. त्यांनी लगेचच त्याला हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. मात्र, मुजोर रिक्षाचालक युसूफ थांबला तर नाहीच, उलट सुसाट वेगात टाकसाळे यांना रिक्षाची धडक दिली. यात त्यांच्या सर्वांगावर जखमा झाल्या असून, हात-पाय आणि बरगडीचे हाड मोडले आहे. त्यांच्यावर सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रवासी पडला, दुचाकीस्वाराला उडविले
पोलिसाला धडक देऊन फरफटत नेल्यानंतर रिक्षाचालक युसूफ मोहंमद अली अन्सारी हा काही थांबला नाही. रिक्षा सुसाट नेत पसार झाला. ही घटना घडल्यानंतर उपस्थित पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला असतानाच त्याने एका दुचाकीस्वारालाही उडविले. वेगात वळण घेत असल्याने त्याच्या रिक्षातील तीन प्रवाशांपैकी एक प्रवासीही रस्त्यावर कोसळला. तरीही तो थांबला नाही. यादरम्यान, पोलिसांनी चालकाचा चेहरा आणि रिक्षाचा क्रमांक तेवढा टिपला.
यापूर्वी महिलेची पर्स हिसकावली
दरम्यान, दि. ११ ऑगस्ट रोजी याच रिक्षाचालकाने रेल्वे स्टेशनवर एका महिलेची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यास उपस्थित पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांसोबत हुज्जत घालत मारहाण केली होती. या प्रकरणातही वेदांतनगर पोलिस ठाण्यातच युसूफ विरोधात गुन्हा नोंद आहे.