केबीसीविरुद्ध दोन दिवसांमध्ये ९७८ गुंतवणूकदारांच्या तक्रारी
By Admin | Updated: July 26, 2014 01:10 IST2014-07-26T01:05:43+5:302014-07-26T01:10:05+5:30
औरंगाबाद : कमीत कमी दिवसांमध्ये गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून राज्यभरातील हजारो नागरिकांना गंडा घालणाऱ्या केबीसी कंपनीविरुद्ध

केबीसीविरुद्ध दोन दिवसांमध्ये ९७८ गुंतवणूकदारांच्या तक्रारी
औरंगाबाद : कमीत कमी दिवसांमध्ये गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून राज्यभरातील हजारो नागरिकांना गंडा घालणाऱ्या केबीसी कंपनीविरुद्ध गेल्या दोन दिवसांमध्ये औरंगाबाद शहरात तब्बल ९७८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारदारांच्या फसवणुकीच्या रकमेचा आकडा सुमारे पावणेआठ कोटी रुपये आहे. नाशिकहून आलेले विशेष पोलीस पथक आयुक्तालयात या तक्रारी नोंदवून घेत आहे.
केबीसीविरुद्ध औरंगाबादेतील गुंतवणूकदारांच्या तक्रारी नोंदवून घेण्यासाठी नाशिक पोलिसांचे एक विशेष पथक गुरुवारपासून औरंगाबादेत तळ ठोकून आहे. गुरुवारप्रमाणे शुक्रवारीही आर्थिक गुन्हे शाखा कार्यालयात फसल्या गेलेल्या गुंतवणूकदारांची तक्रार नोंदविण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली. गुरुवारी नाशिकच्या या पथकाकडे ३२१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. शुक्रवारी आणखी ६५१ तक्रारी प्राप्त झाल्याचे गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक आयुक्त अविनाश आघाव यांनी सांगितले. आतापर्यंत प्राप्त झालेल्या ९७८ तक्रारदारांच्या फसवणुकीचा आकडा ७ कोटी ८४ लाख ८ हजार ५०० रुपये इतका असल्याचे आघाव म्हणाले. नाशिकला जाऊन ज्या गुंतवणूकदारांनी केबीसीमध्ये पैसे भरले होते, त्यांचा हा आकडा असून, औरंगाबादेत पैसे भरणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचा आकडा सुमारे ६० आहे.
नाशिकचे हे पोलीस पथक शनिवारीही औरंगाबादेत राहणार आहे. ज्या गुंतवणूकदारांना तक्रारी नोंदवायच्या आहेत, त्यांनी नोंदवाव्यात, असे आवाहन आघाव यांनी केले.