२५ टक्के शस्त्रक्रिया ढकलल्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:02 IST2017-10-08T00:02:16+5:302017-10-08T00:02:16+5:30

शहरातील भारनियमनाचा रुग्णसेवेवर सर्वाधिक परिणाम होत आहे. नऊ तासांपर्यंत होणा-या भारनियमनाने नियोजित २५ टक्के शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ रुग्णालयांवर ओढावत आहे

25 percent of the surgeries postponed | २५ टक्के शस्त्रक्रिया ढकलल्या पुढे

२५ टक्के शस्त्रक्रिया ढकलल्या पुढे

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील भारनियमनाचा रुग्णसेवेवर सर्वाधिक परिणाम होत आहे. नऊ तासांपर्यंत होणा-या भारनियमनाने नियोजित २५ टक्के शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ रुग्णालयांवर ओढावत आहे. भारनियमनाच्या कालावधीत जनरेटरवर रुग्णालयातील सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक शस्त्रक्रियांना आधी प्राधान्य दिले जात असल्याचे शहरातील डॉक्टरांनी सांगितले.
शहरात छोट्या-मोठ्या खाजगी रुग्णालयांची संख्या चारशेवर आहे. सप्टेंबरपासून सुरू झालेल्या भारनियमनाने इतर सेवांप्रमाणे रुग्णसेवेतही अनेक अडचणी निर्माण होत आहेत. नऊ तासांपर्यंत भारनियमन होत आहे. परिणामी जनरेटर असूनही सेवा देण्यास रुग्णालय प्रशासनाला अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
शस्त्रक्रियागारातील बहुतांश वैद्यकीय उपकरणे ही विजेवर चालणारी असतात. त्यासाठी शस्त्रक्रिया करताना वीज असणे आवश्यक असते. जनरेटरद्वारे काही तासांसाठी वीजपुरवठा होतो. शिवाय काही उपकरणे जेनरेटरवर चालत नाहीत.
भारनियमनाच्या काळात अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. रुग्णाच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही अशाच शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचे नियोजन केले जात आहे.
आयसीयू, तसेच व्हेंटिलेटरची सेवा सुरळीत ठेवणे अवघड होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सायंकाळच्या वेळेतील भारनियमनामुळे जनरेटर, इर्न्व्हटर नसलेल्या छोट्या रुग्णालयांतील बाह्यरुग्ण सेवा विस्कळीत होत आहे.

Web Title: 25 percent of the surgeries postponed