‘एक टन ई-कचऱ्यातून २०० ग्रॅम सोनं’! प्रा. पूजा सोनवणेंच्या संशोधनास आंतरराष्ट्रीय सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 19:23 IST2025-11-19T19:04:44+5:302025-11-19T19:23:42+5:30
ई-कचरा व्यवस्थापनावर संशोधन : शासकीय विज्ञान संस्थेच्या प्रा. डॉ. पूजा सोनवणे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

‘एक टन ई-कचऱ्यातून २०० ग्रॅम सोनं’! प्रा. पूजा सोनवणेंच्या संशोधनास आंतरराष्ट्रीय सन्मान
छत्रपती संभाजीनगर : ‘कचरा’ म्हणजे केवळ समस्या नव्हे, तर तो हजारो कोटींचा ‘खजिना’ असू शकतो, हे छत्रपती संभाजीनगरमधील एका मराठमोळ्या संशोधिकेने जगाला दाखवून दिले. शासकीय विज्ञान संस्थेतील प्राध्यापिका डॉ. पूजा सोनवणे यांना त्यांच्या ई-कचरा व्यवस्थापनावर केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्कृष्ट संशोधन पुरस्काराने गौरवण्यात आले. देवभूमी उत्तराखंड विद्यापीठात दि. १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यानझालेल्या ६६ व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. सोनवणे यांचा ‘एएमआय स्प्रिंगर नेचर’कडून ३०० युरो मूल्याचे ‘स्प्रिंगर व्हाउचर’ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
ई-कचरा निर्मितीमध्ये भारत सध्या अमेरिका आणि चीननंतर जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही गंभीर समस्या भविष्यात मोठी डोकेदुखी ठरू शकते. याच धोक्यावर डॉ. सोनवणे यांनी ‘बायोलीचिंग’ नावाचे एक शक्तिशाली स्वदेशी तंत्रज्ञान वरदान ठरेल, असे संशोधन केले. डॉ. सोनवणे यांनी सिद्ध केले की, टाकून दिलेले जुने मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही आणि सर्व्हर व सर्किट बोर्ड्स अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये तांबे, निकेल, झिंक, टीन, ॲल्युमिनियम यांसारखे मूलभूत धातू तसेच सोने, चांदी, पॅलेडियम आणि प्लॅटिनम यांसारखे मौल्यवान धातू दडलेले आहेत. ‘बायोलीचिंग’ प्रक्रियेद्वारे हे धातू पर्यावरणपूरक पद्धतीने आणि कमी खर्चात पुनर्प्राप्त करता येतात.
भारत ई-कचरा व्यवस्थापनात ‘लीडर’ बनू शकतो
डॉ. सोनवणे यांच्या मते, “ई-कचरा व्यवस्थापन ही केवळ पर्यावरण समस्या नाही, तर मोठी आर्थिक संधी आहे. हायब्रीड तंत्रज्ञान आणि कठोर नियम लागू करून भारत लवकरच या क्षेत्रात जागतिक ‘लीडर’ बनू शकतो.”
बायोलीचिंग प्रक्रियेतून ‘खजिना’ मिळणार
ई-कचरा निर्मितीच्या गंभीर समस्येवर ‘बायोलीचिंग’ ही कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक प्रक्रिया वरदान ठरू शकते, हे या संशोधन सादरीकरणातून अधोरेखित केले. बायोलीचिंग म्हणजे विशिष्ट सूक्ष्मजंतूंचा उपयोग करून धातू असलेल्या खनिजांमधून किंवा ई-वेस्टमधून धातू वेगळे काढण्याची प्रक्रिया. हे सूक्ष्मजंतू आम्ल किंवा ऑक्सिडायझिंग संयुगे तयार करून खनिजांचे विघटन करतात आणि त्यातून मौल्यवान धातू मुक्त करतात. ही प्रक्रिया वापरून १ टन सर्किट बोर्ड्स आणि सर्व्हरच्या ई-कचऱ्यात १५०-२०० ग्रॅम सोने, ८००–१००० ग्रॅम चांदी, १५०-२०० किलो तांबे आणि पॅलेडियमचे अंश मिळू शकतात.