जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अविश्वासाच्या हालचाली

By Admin | Updated: April 9, 2016 01:29 IST2016-04-09T01:29:16+5:302016-04-09T01:29:16+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पुन्हा अविश्वासाचे वारे वाहायला लागले आहेत.

Untrustworthy movements in District Central Co-operative Banks | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अविश्वासाच्या हालचाली

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अविश्वासाच्या हालचाली

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पुन्हा अविश्वासाचे वारे वाहायला लागले आहेत. बँकेचे विद्यमान अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील नाराज गटनेत्यांनी संचालकांची जुळवाजुळव सुरू केल्याने बँकेवर अविश्वासाचे ढग काळवंडले आहेत.
२७ संचालकमंडळ असलेल्या या बँकेत सर्वाधिक म्हणजे २० संचालक काँग्रेसचे आहेत. तरीही स्वपक्षाविरोधातच ही हालचाल सुरू झाल्याने या अविश्वासामागील कारणांची चर्चाही आता रंगायला लागली आहे. तत्कालिन अध्यक्ष शेखर धोटे यांच्याविषयी वाढत चाललेल्या नाराजीनंतर त्यांनी स्वत:हून पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सुमारे नऊ महिन्यांपूर्वी पाऊणकर यांना त्यांच्याच पुढाकाराने अध्यक्ष करण्यात आले होते. मात्र या मित्रगटातील अंतर वाढत चालल्याची चर्चा अलिकडे व्हायला लागली होती. केवळ दीड वर्ष उरले असताना पाऊणकर यांच्याविरोधात अविश्वासाच्या हालचाली सुरू झाल्याने बँकेतील वातावरण ढवळले आहे. काँग्रेससह राष्ट्रवादीच्या गटाचे बहुतेक संचालक पाऊणकरांच्या विरोधात एकत्र आले असून त्यातील काही प्रवासाला निघाल्याची माहिती आहे. या संचालकांंमध्ये सुमारे चार ते पाच जण अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. त्यामुळे अध्यक्षपद कुणाला द्यायचे याबद्दल एकमत करताना बरीच कसरत या गटाला करावी लागणार आहे. सध्यातरी अविश्वास प्रस्ताव दाखल व्हायचा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Untrustworthy movements in District Central Co-operative Banks