वीज वाहिनी वस्तीतून नेण्यामागे अल्ट्राटेकचे कारस्थान

By Admin | Updated: June 7, 2014 23:51 IST2014-06-07T23:51:20+5:302014-06-07T23:51:20+5:30

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्यावतीने २२0 केव्ही वीज वाहिनीच्या टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. मात्र ही वाहिनी चक्क नांदा फाटा येथील वार्ड क्रमांक पाचमधून नेली जाणार आहे. यामागे अल्ट्राटेक कंपनीचे

Ultratech's capture of electricity channel | वीज वाहिनी वस्तीतून नेण्यामागे अल्ट्राटेकचे कारस्थान

वीज वाहिनी वस्तीतून नेण्यामागे अल्ट्राटेकचे कारस्थान

चंद्रपूर : अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्यावतीने २२0 केव्ही वीज वाहिनीच्या टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. मात्र ही वाहिनी चक्क नांदा   फाटा येथील वार्ड क्रमांक पाचमधून नेली जाणार आहे. यामागे अल्ट्राटेक कंपनीचे कारस्थान असून निव्वळ खर्च वाचविण्यासाठी हा खटाटोप आहे, असा आरोप आज शनिवारी नांदा येथील नागरिकांनी पत्रकार परिषदेतून केला.
नांदा फाटा परिसरात सध्या २२0 केव्ही टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. ही वाहिनी थेट वार्ड क्रमांक पाचमधून चालली आहे. या वाहिनीमुळे आपल्या वस्तीतील नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचे मत येथील नागरिकांचे आहे. या संदर्भात माहिती देताना प्रणबकुमार शहा म्हणाले, ही वाहिनी ज्या परिसरातून जाणार आहे, त्याखाली १५0 घरे आहे. नियमानुसार, मानवी वस्तीमधून उच्चदाब क्षमतेची वीज  वाहिनी नेता येत नाही. तसेच त्यासाठी वस्तीत मनोरेही उभारले जाऊ शकत नाहीत. तरीही मनोर्‍यांसाठी सपन बाला आणि किशोरसिंग राठोड यांच्या अंगणात खड्डे उभारण्यात आले आहेत. २२0 केव्ही वाहिनी या नागरिकांच्या घरावरुन गेल्यास त्याखाली वास्तव्य करणे जोखमीचे आहे. त्यामुळे वस्तीतून वाहिनी नेण्याला आपला विरोध आहे.
या संदर्भात ५ जूनला जिल्हाधिकार्‍यांना भेटून निवेदन दिले असता, त्यांनी तात्पुरते काम थांबविण्याचे आणि उपविभागीय अधिकार्‍यांकडून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महापारेषणचे अभियंता गाडगे यांनाही त्याच दिवशी भेटून नागरिकांनी निवेदन दिले. त्यांनीही काम थांबविण्याचे आणि सर्व्हेअरकडून चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, टॉवरमुळे नागरिकांच्या जीवाला कसलाही धोका नसल्याचे सर्व्हेअरकडून  सांगितले जात आहे.
अल्ट्राटेक कंपनी मनोर्‍यांच्या उभारणीचा खर्च वाचविण्यासाठी आपल्या जीवाशी खेळत असल्याचा आरोपही यावेळी पत्रकार परिषदेतून करण्यात आला. ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र नसतानाही हे काम सुरू आहे. येथील सरपंच व उपसरपंच टॉवर उभारणीसाठी नागरिकांना विनंती करत आहेत. एवढेच नाही तर, यासाठी विरोध करणार्‍यांना कंपनीतील कामावरून काढले जात आहे. यावरून अल्ट्राटेक कंपनी दबावतंत्राचे धोरण आखत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. या विरोधात आपण गावकर्‍यांसह आंदोलन उभारू, प्रसंगी आत्मदहनसुद्धा करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला पल्लव शहा, मिलन गोयल, प्रदीप हलधर, गोविंद राऊत, अनिल प्रसाद, अनिता गोयल, सुमन यादव, रंजीता सिंग आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
 

Web Title: Ultratech's capture of electricity channel