चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील नवरगावलगतच्या रत्नापूर शेतशिवारात रविवारी दुपारी घडलेल्या नाट्यमय घटनेने संपूर्ण परिसर हादरला. मक्याच्या शेतात बैलाची शिकार करून बछड्यांसह दबा धरून बसलेल्या वाघीणीने वनरक्षकावर अचानक हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. विशेष म्हणजे, या घटनेनंतर अवघ्या तासाभरातच वाघीण मृतावस्थेत आढळल्याने रहस्य अधिक गडद झाले आहे.
घटना अशी उलगडलीसिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपक्षेत्रातील रत्नापूर येथील शेतकरी मंगेश तोंडफोडे हे रविवारी सकाळी सुमारे ११.३० वाजता शेतात फेरफटका मारत असताना मक्याच्या पिकाजवळ बैल मृत अवस्थेत आढळला. संशय आल्याने त्यांनी परिसराची पाहणी केली असता, मका पिकात वाघीण आणि तिचे तीन बछडे असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तत्काळ वनविभाग व गावकऱ्यांना माहिती दिली.
गर्दी ठरली घातकवाघ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. वाढत्या गोंधळामुळे वाघीण अस्वस्थ झाली आणि बछड्यांसह सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू लागली. या धावपळीत बछडे वेगवेगळ्या दिशेने पसार झाले, तर वाघीण एकटीच अडकली.
वनरक्षकावर अचानक हल्लायाच गोंधळात नाचनभट्टी येथील वनरक्षक सज्जन पारेकर यांच्यावर वाघीणीने झडप घालत हल्ला केला. त्यांच्या हात व पायाला गंभीर जखमा झाल्या. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सिंदेवाहीमार्गे चंद्रपूर येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
तासाभरातच वाघीण मृतहल्ल्यानंतर वाघीण रत्नापूर–शंकरपट मार्गालगत दामोदर लोधे यांच्या धानशेतात जाऊन लपली. दरम्यान, परिसरात नागरिकांची गर्दी कायम होती. सुमारे एका तासानंतर तीच वाघीण मृतावस्थेत आढळून आली. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट नसून शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येणार आहे.
“वाघीणीची ओळख अद्याप पटलेली नाही. बछड्यांचा शोध सुरू असून शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.”— अंजली सायंकार (बोरावार), वनपरिक्षेत्र अधिकारी, सिंदेवाही
अशीही पार्श्वभूमी- मागील २–३ महिन्यांपासून वाघीण व तिचे तीन बछडे नवरगाव परिसरात वावरत होते- बछड्यांचे वय अंदाजे ६–७ महिने- स्वबळावर शिकार करण्यास अद्याप सक्षम नसल्याने त्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह
थरारक प्रसंगवाघीण आपल्या दिशेने येताना पाहून एक व्यक्ती सावरीच्या काटेरी झाडावर चढून बसला. वाघीण बराच वेळ त्या झाडाखालीच थांबून होती. अखेर वाघीण मृत झाल्याची खात्री पटेपर्यंत तो व्यक्ती झाडावरच थांबून राहिला. त्याची ओळख मात्र समजू शकली नाही.
अनुत्तरित प्रश्न- वाघीणीचा मृत्यू नैसर्गिक की मानवनिर्मित?- नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती चिघळली का?- बछड्यांचे पुढील पुनर्वसन कसे होणार?
मानव-वन्यजीव संघर्षरत्नापूरमधील ही घटना मानव–वन्यजीव संघर्षाचे भीषण वास्तव अधोरेखित करते. अनियंत्रित गर्दी आणि उत्सुकतेपोटी घेतलेले निर्णय किती जीवघेणे ठरू शकतात, याचा प्रत्यय या घटनेने आला.
Web Summary : A tigress in Ratnapur attacked a forest guard after hunting, severely injuring him. The tigress was later found dead within an hour, sparking investigation.
Web Summary : रत्नापुर में एक बाघिन ने शिकार के बाद वन रक्षक पर हमला कर दिया, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गया। बाघिन बाद में एक घंटे के भीतर मृत पाई गई, जिससे जांच शुरू हो गई।