सुशी दाबगाव येथे रानडुकरांचा उपद्रव

By Admin | Updated: December 16, 2014 22:50 IST2014-12-16T22:50:59+5:302014-12-16T22:50:59+5:30

मूल तालुक्यातील सुशी, दाबगाव, मक्ता व परिसरातील गावांच्या शेतशिवारात गेल्या अनेक महिन्यांपासून रानडुकरांचा धुमाकूळ सुरु आहे. यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

Rowdy Ruckus at Sushi Dabgaon | सुशी दाबगाव येथे रानडुकरांचा उपद्रव

सुशी दाबगाव येथे रानडुकरांचा उपद्रव

सुशीदाबगाव : मूल तालुक्यातील सुशी, दाबगाव, मक्ता व परिसरातील गावांच्या शेतशिवारात गेल्या अनेक महिन्यांपासून रानडुकरांचा धुमाकूळ सुरु आहे. यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
सुशी, दाबगाव मक्ता व परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात धान पीक घेतल्या जाते. शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहाचे साधनही भातपिकच आहे. यावर्षीच्या हंगामात सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यावर्षी चांगले उत्पन्न होईल, अशी अपेक्षा ठेऊन बळीराजाने मोठ्या उत्साहाने धानाची पेरणी केली. मात्र काही दिवसातच पावसाने दडी मारली. त्यामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची झळ सहन करावी लागली. एवढेच नाही तर पावसाळाच्या दिवसातच पावसाने दडी मारल्याने धानाची पेरणी करुनही पाण्याअभावी बळीराजाला धानाची रोवणी करता आली नाही. ज्यांच्याकडे पाण्याची मुबलक सोय उपलब्ध होती, त्यांनी कशीबशी रोवणी केली. काहींना तर धानाची एक पेंढीही रोवता आली नाही. ज्यांनी रोवणी केली, त्यापैकी काहींची रोवणी पाण्याअभावी जागेवरच करपून गेली तर काहींची रोवणी (पाणी असलेली) जगली. पण त्याही पिकावर रोगाने आक्रमण केले. धान कसेबसे जगून कापणीला आले. मात्र आता रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रानडुकरांनी आपला मोर्चा सुशी दाबगाव व परिसरातील गावांकडे वळविला आहे. शेतात धुमाकूळ घालून या रानडुकरांनी अनेकांच्या शेतीची नासधुस केली. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर गावे ही जंगली शिवाराला लागून आहेत. याबाबतीत वनविभाग सूचना देऊनही काहीच उपाययोजना होत नसल्याने वन विभागाबद्दल सुशी दाबगाव व परिसरातील शेतकऱ्यांत तिव्र रोष व्यक्त होत आहे. वन विभागाने लक्ष पूरवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Rowdy Ruckus at Sushi Dabgaon