दारूच्या रिकाम्या बाटल्यांची खरेदी संशयात

By Admin | Updated: December 26, 2015 01:23 IST2015-12-26T01:23:31+5:302015-12-26T01:23:31+5:30

वरोरा येथील काही भंगार दुकानातून देशी दारूच्या खाली बाटल्यांची खरेदी केली जात आहे.

Purchase of empty bottles of alcohol | दारूच्या रिकाम्या बाटल्यांची खरेदी संशयात

दारूच्या रिकाम्या बाटल्यांची खरेदी संशयात

भंगार दुकानात खरेदी : बनावट दारू निर्मितीची शक्यता
चंद्रपूर: वरोरा येथील काही भंगार दुकानातून देशी दारूच्या खाली बाटल्यांची खरेदी केली जात आहे. रासायनिक पदार्थापासून दारू तयार करुन ती सदर बाटल्यात भरुन विकली जात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होऊन नऊ महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी अवैध दारूविक्रीला आळा घालण्यात प्रशासनाला यश आले नाही. यवतमाळ, नागपूर या लगतच्या जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी सुरु असल्याचे अनेक प्रकरणातून उघड झाले आहे. काही अवैध दारूविक्रेते कमी अवधीत जास्त पैसे कमाविण्याच्या मोहात परप्रांतातील स्वस्त दारूची तस्करी करुन ती चढ्या दराने विकत आहे. अशा विक्रेत्यांवर पोलिसांची नजर असली तरीही दारूसाठा आणल्या जातो. काही अवैध दारूविक्रेत्यांनी शक्कल लढवून रासायनिक पदार्थापासून दारू तयार करुन तिची विक्री सुरु केली आहे. यासाठी इथेनॉल, स्पीरिटचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे.
नागपूर- चंद्रपूर या राज्य महामार्गावरील एका व्यावसायिकांकडून नेहमी वरोरा येथील भंगार दुकानातील देशी दारुच्या खाली बाटल्याची खरेदी केल्या जाते, अशी माहिती आहे. या बाटल्यांची स्वच्छता आणि नाविन्यता यानुसार त्यांच्याकडून रिकाम्या बाटल्यांना भाव दिला जातो. रासायनिक पदार्थापासून दारू तयार करुन ती या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरुन विकली जाते. यामुळे दारू पिणाऱ्यांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता आहे.
विषारी दारूमुळे मुंबई जवळील मालवण येथील घटनेत शंभरपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. वरोरा तालुका परिसरात असा प्रकार सुरु असल्यास त्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असल्याने दारूजन्य रासायनिक पदार्थ जिल्ह्यात आणणे कठीण नाही. यामुळे पोलीस प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगून तपास करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Purchase of empty bottles of alcohol