‘माविम’ने दिला दोन हजार महिलांना गावातच स्वयंरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:00 AM2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:00:48+5:30

महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्ह्यातील महिलांना रोजगार व उपजीविका मिळविण्याच्या हेतूने कार्य करीत आहे. शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी वर्षभर नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू आहेत. लॉकडाऊन काळातही स्वयंरोजगाराचे उपक्रम नित्यनेमाने सुरू होते.

Mavim provided self-employment to 2,000 women in the village itself | ‘माविम’ने दिला दोन हजार महिलांना गावातच स्वयंरोजगार

‘माविम’ने दिला दोन हजार महिलांना गावातच स्वयंरोजगार

Next
ठळक मुद्दे१५ महिला बचतगट आत्मनिर्भर : लॉकडाऊन काळात तयार केल्या देखण्या राख्या

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात तीन महिने लॉकडाऊन होते. या काळात ग्रामीण भागातील गरीबांचा रोजगार बुडाला. अशाही परिस्थितीत महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालयाने दीर्घकालीन नियोजन करून दोन हजार महिलांना गावातच स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला. रक्षाबंधनासाठी तयार केलेल्या देखण्या राख्या राज्यातील विविध भागांमध्ये पाठविण्याची तयारी केली जात आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्ह्यातील महिलांना रोजगार व उपजीविका मिळविण्याच्या हेतूने कार्य करीत आहे. शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी वर्षभर नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू आहेत. लॉकडाऊन काळातही स्वयंरोजगाराचे उपक्रम नित्यनेमाने सुरू होते. महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्र्रपूर व चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त प्रयत्नातून चंद्र्रपूर, मूल, पोंभुर्णा, चिमूर व विसापूर येथील महिलांना बांबूपासून राखी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. लॉकडाऊनकाळात महिला घरीच होत्या. या वेळेचा त्यांनी सदूपयोग केला. विविध प्रकारच्या हजारो देखण्या राख्या तयार करण्यासाठी माविमने महत्त्वाची भूमिका बजावली. २५० महिलांना गावातच रोजगार मिळाला आहे. कुक्कुटपालन योजनेतंर्गत १ हजार ७३० महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. भविष्यातही महिला आर्थिक विकास महामंडळाकडून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. विविध कल्याणकारी उपक्रम राबवून महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर केले जाणार आहे.

शेतीच्या कामांसाठी लावले ट्रॅक्टर
मानव विकास मिशन कार्यक्रम अंतर्गत ९ तालुक्यातील १५ बचत गटांच्या १८० महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाने जिल्हा परिषद कृषी विकास विभागाच्या सहाय्याने ट्रॅक्टर व कृषी अवजारे उपलब्ध करून देण्यात आले. कृषी अवजारांमुळे महिला व शेतकऱ्यांनी शेतीच्या कामात कामात मदत झाली. सोबतच शेतकरी कुटुंबांचा आर्थिक भारही कमी झाला आहे.

१३ साधन केंद्रांना दिले बळ
माविमच्या वतीने १३ लोकसंचालित साधन केंद्रांची निर्मिती करण्यात आली. यामध्ये खुशिया (चंद्रपूर), समन्वय (भद्रावती), सावित्री (वरोरा), आधार, मैत्री (चिमूर), आदर्श (ब्रह्मपुरी), दिशा (नागभीड-सिंदेवाही), मैत्रीण (मूल-सावली), संकल्प (पोंभुर्णा), सहयोग (गोंडपिपरी), सर्वोदय (कोरपना जिवती) व अन्य केंद्रांचा समावेश आहे.

नाविण्यपूर्ण कार्पेट युनिट
ग्रामीण भागातील महिलांना योग्य प्रशिक्षण दिल्यास त्यांच्या सुप्त कलागुणांचा सहजपणे विकास होतो. त्यातून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतात हे, माविम चंद्र्रपूर व वूल रिसर्च असोसिएशनने कार्पेट युनिटद्वारे सिद्ध करून दाखविले. देशभरातील कुठल्याही ग्राहकाला पसंत पडेल, अशा उत्कृष्ट कार्पेटची निर्मिती लॉकडाऊन काळात करण्यात आली. या प्रकल्पाची व्याप्ती वाढत आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करून नेतृत्व तयार करणे हा माविमचा उद्देश आहे. त्यासाठी अनेक प्रकल्प सुरू आहेत. लॉकडाऊन कालावधीत सोशल डिस्टन्सिंग पाळून सर्वच प्रकल्प सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे हजारो महिलांना गावात रोजगार मिळाला.
- नरेश उगेमुगे, जिल्हा वरिष्ठ समन्वय अधिकारी,महिला आर्थिक विकास महामंडळ, चंद्रपूर

Web Title: Mavim provided self-employment to 2,000 women in the village itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.