वर्ष लोटूनही अवैध दारूविक्री रोखण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 01:21 IST2016-04-09T01:21:45+5:302016-04-09T01:21:45+5:30

राज्य शासनाने १ एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा महत्वकांक्षी निर्णय घेतला. या निर्णयाने जिल्ह्यातील महिलांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण होते

Failure to prevent illegal liquor trade by years | वर्ष लोटूनही अवैध दारूविक्री रोखण्यात अपयश

वर्ष लोटूनही अवैध दारूविक्री रोखण्यात अपयश

महिला वर्ग त्रस्त : प्रभावी अंमलबजावणीची मागणी
राजुरा : राज्य शासनाने १ एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा महत्वकांक्षी निर्णय घेतला. या निर्णयाने जिल्ह्यातील महिलांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण होते. विशेषत: ग्रामीण भागात तर दारूबंदीच्या निर्णयाने महिलांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला होता. परंतु महिनाभर होत नाही तोच अवैध दारूविक्रीने सर्वत्र जिल्हाभर थैमान घातले. ही दारूबंदी प्रभावी राबवावी, यासाठी सामाजीक संस्था, महिला मंडळे व लोकप्रतिनिधीकडून पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. पण दारूबंदीला एक वर्षाचा काळ लोटूनही यावर लगाम लावण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राजुरा तालुका हा आधीपासून मागासलेला आहे. या तालुक्यात मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने कामानंतर मद्य पिणाऱ्यांची लक्षणीय संख्या ही राजुरा शहरात बघायला मिळत होती. पण दारूबंदीच्या निर्णयानंतर हे प्रमाण अंशत: नाहीसे, होईल अशी जनसामान्याची अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा दारूबंदीच्या वर्षपूर्तीनंतरही अपेक्षाभंग होत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे.
राजुरा शहरात सध्या ‘फोन करा, दारू मिळवा’ अशी स्थिती निर्माण झाली असुन दारूची घरपोच सुविधा सुरू आहे. या अवैध दारूविक्रीच्या धंद्यात मोठ्यासह विद्यार्थी व महिलाही मोठ्या संख्येने गुंतल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात अधिकाऱ्यांनी दिलेला टार्गेट पूर्ण करण्याच्या व प्रसिद्धी माध्यमांमध्ये झळकण्यासाठी काही तुटपुंज्या कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहे. आजही राजुरा तालुक्यातील लक्कडकोट मार्गावरून दारूची सर्रास वाहतूक होत असून याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे बोलल्या जात आहे.
दारूबंदी निर्णयानंतर तेलंगणा राज्यातील दारूची तस्करी रोखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून लक्कडकोट येथे तपासणी नाका उभारण्यात आला होता. त्या नाक्यावर तेलंगणा राज्यातून येणाऱ्या वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. मात्र काही दिवसांनी स्थानिक प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या समन्वयाच्या अभावाने उभारण्यात आलेला तपासणी नाका काढण्यात आला. यामुळे दिवसरात्र सर्रास दुचाकी तर कधी चारचाकी वाहनाने दारूची तस्करी होत आहे. यावर आळा घालण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Failure to prevent illegal liquor trade by years