Discussion with the Governor to compensate farmers | शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्यपालांशी चर्चा
शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्यपालांशी चर्चा

ठळक मुद्देजोरगेवार यांनी घेतली भेट । तातडीने मदत करण्यासाठी निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शनिवारी मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली.
यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे कपाशी, सोयाबीनसह विभिन्न पीक घेणाºया शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व प्रोत्साहन मदत मिळावी, याकरिता राज्यपालांना निवेदनही दिले. यावेळी पावसामुळे जिल्हाभरात तसेच राज्यात उदभवलेल्या संकटावरही विस्तृत चर्चा झाली. याच कालावधीत लागलेल्या निवडणुकांचा निकाल लागूनही सरकार स्थापन न झाल्याने निर्माण झालेला पेच आणि नंतर राज्यात लागू झालेली राष्ट्रपती राजवट या सर्व घडामोडींमुळे अस्मानी संकटात सापडलेल्या बळीराजाकडे दुर्लक्ष होत असल्याचे आमदार जोरगेवार यांनी राज्यपालांना सांगितले. चंद्रपूर येथील शेतकºयांची वर्तमान बिकट परिस्थिती समजून घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासंदर्भात जोरगेवार यांना आश्वस्त केले. याच चर्चेदरम्यान आमदार जोरगेवार यांनी मंत्रालयातील ७ व्या व ६ व्या मजल्यावरील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कोणतीही पूर्व सूचना न देता बंद झाले असल्याने ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्णांचे आर्थिक मदतीअभावी हाल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. अशा रुग्णांसाठी तातडीची उपायजोजना म्हणून आर्थिक सहकार्याची तरतूद करण्याची विनंती केली.
आमदार जोरगेवार यांनी राज्यपालांपुढे शेतकऱ्यांची कैफीयतच मांडली. चंद्रपूर जिल्ह्यातील ९७ हजार ८७२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हातात आलेले पीक ऐनवेळी उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले.

Web Title: Discussion with the Governor to compensate farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.