उद्योग असतानाही स्थानिक युवक बेरोजगार

By Admin | Updated: June 26, 2015 01:19 IST2015-06-26T01:19:24+5:302015-06-26T01:19:24+5:30

आंध्र-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक उद्योग असूनही...

Despite the industry, local youths are unemployed | उद्योग असतानाही स्थानिक युवक बेरोजगार

उद्योग असतानाही स्थानिक युवक बेरोजगार

कोरपना : आंध्र-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक उद्योग असूनही लोकप्रतिनिधीच्या नाकर्तेपणामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत. यामुळे बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी या तालुक्यांचा समावेश आहे. राजुरा तालुक्यात एक सिमेंट उद्योग सात खुल्या व भूमिगत खाणी व तीन कोल वॉशिरीज आहेत. कोरपना तालुक्यात अल्ट्राटेक, माणिकगड व मुरली अ‍ॅग्रो सिमेंट उद्योग आहेत. परंतु जिवती व गोंडपिपरी तालुक्यात एकही उद्योग नसल्यामुळे हे तालुके औद्योगिकदृष्ट्या विकासाच्या दृष्टीने असंतुलित आहेत. उद्योगासाठी विपुल प्रमाणात असलेला खनिजसाठा प्रचंड असल्यामुळे येथील उद्योगांनी बऱ्यापैकी बस्तान मांडले आहे. उद्योगासाठी लागणारी जमीन अतिशय अल्प मोबदला देऊन अधिग्रहीत करण्यात आल्या. त्यामुळे शेतकरी भूमिहीन झाला. कारखान्यातून निघणाऱ्या धुळीमुळे परिसरातील क्षेत्र, जमिनी नापिक होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. सिंचनासाठी बांधलेल्या जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाणी उद्योगांना पुरविल्या जात असल्यामुळे शेतसिंचनासाठी शेतकऱ्यांना प्रकल्पाचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तरीही स्थानिकांना रोजगार न देता परप्रांतीयांचा भरणा उद्योगात केला जात आहे. बऱ्याच ठिकाणी स्फोटकाच्या वापर करून कोळसा काढत असल्याने परिसरातील घरांना भेगा पडू लागल्यामुळे जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहे. खुल्या खाणीमुळे कृत्रिम मातीचे ढिगारे निर्माण झाले. खुल्या वाहनाने कोळशाची वाहतूक होत असल्यामुळे दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदुषणामुळे टि.बी. फुफ्फुसाचे आजार, दमा यासारख्या रोगांना बळी पडावे लागत आहे. कोळसा धुण्यासाठी भूगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा समस्या भविष्यात निर्माण होऊ नये यासाठी शासनाने उद्योगावर कडक निर्बंध लादणे आवश्यक आहे. स्थानिकांना उद्योगात रोजगार मिळावा, पाणी टंचाई प्रश्न शासन स्तरावर सोडवावा, शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्या आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Despite the industry, local youths are unemployed