भद्रावती : जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये डी. एड्. नियुक्त शिक्षक चक्क दहावीला शिकवतात आणि बोर्डाचे पेपरही तपासतात. ही नियमबाह्य कामे त्वरित थांबविण्याची मागणी महाराष्ट्र माध्यमिक डी. एड्. शिक्षक महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष देविदास जांभुळे यांनी केली आहे.
माध्यमिक शाळांमध्ये पाचवीला शिकविण्याकरिता एस.एस.सी., एच.एस.सी. डी.एड्., सहावी ते आठवीला शिकविण्यासाठी पदवीधर डी.एड्., नववी ते दहावीला पदवीधर बी.एड्. ही शैक्षणिक पात्रता गृहित आहे. त्याप्रमाणे विद्यार्थी संख्येनुसार संचमान्यतेत शिक्षक पदे मंजूर करतात. व्यवस्थापन अशाप्रकारे भरती करते. परंतु वर्कलोड देताना डी. एड. नियुक्त शिक्षकांना नववी व दहावीच्या वर्गांना विषय शिकविण्यासाठी देतात. नववी, दहावीला नेमणूक नसणारे शिक्षक दहावीला शिकविण्याकरिता पात्र आहेत काय? दहावी बोर्डाचे पेपर तपासण्यासाठी पात्र आहेत काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
जर त्या शिक्षकांनी शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता वाढविली असेल तर त्यांना उन्नत केले काय? त्यांना संबंधित वेतनश्रेणी दिली काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. डी.एड्. नियुक्त शिक्षकांनी त्यांची शैक्षणिक व्यवसायिक पात्रता वाढविली तर त्यांना उन्नत करणे गरजेचे आहे. पूर्व माध्यमिक विभागात २५ टक्के व आता ३३ टक्के पदवीधर शिक्षकांच्या कोटा हा डी. एड्. शिक्षकांसाठी आहे. परंतु व्यवस्थापन त्यांच्या हितसंबंधांसाठी बाहेरील डी. एड्. उमेदवारांकडून २५ टक्के कोट्यातील पदवीधर शिक्षकांच्या जागा भरल्या जातात. डी. एड्. शिक्षकांनी वेतनश्रेणी किंवा उन्नती, पदोन्नती मागितल्यास त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येतात. परंतु संपूर्ण कामे त्यांच्याकडून करून घेतली जाते. हा अन्याय यापुढे डी. एड्. शिक्षक सहन करणार नाहीत, असा इशारा देविदास जांभुळे यांनी दिला आहे.