‘हॅलो चांदा’वर तक्रारींचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:10 IST2017-07-21T01:10:19+5:302017-07-21T01:10:19+5:30

राज्यात केवळ चंद्रपूरमध्ये सुरु झालेल्या ‘हॅलो चांदा’ पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेवर दूरध्वनी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Complaints about 'Hello Chanda' | ‘हॅलो चांदा’वर तक्रारींचा ओघ

‘हॅलो चांदा’वर तक्रारींचा ओघ

शेकडो तक्रारी : १६ निकाली, अडीचशेवर तक्रारी प्रक्रियेत
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यात केवळ चंद्रपूरमध्ये सुरु झालेल्या ‘हॅलो चांदा’ पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेवर दूरध्वनी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक ठिकाणावरुन दूरध्वनी व्यस्त असल्यामुळे तक्रार दाखल न करता आल्याची नागरिकांची तक्रार आहे. तथापी एकाचवेळी अनेक फोन येत असल्यामुळे व्यस्तता येत असून नागरिकांनी ही तांत्रिक बाब समजून या यंत्रणेचा फायदा घेणे सुरु ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
१५ जुलैपासून सुरु झालेल्या पालकमंत्री तक्रार निवारण केंद्रावर दीड हजारावर नागरिकांनी मोबाईलवर तक्रारी केल्या आहेत. आतापर्यंत शेकडो तक्रारींची नोंदणी झाली असून यावर जिल्हा प्रशासन संबंधित विभागाकडून जाब मागत आहे. एक महिन्याच्या आत तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा असून आतापर्यंत तात्काळ निकाल देता येण्यासारख्या १६ तक्रारींची सोडवणूक करण्यात आली आहे. नागरिकांच्या अडीशेच्यावर तक्रारी प्रक्रियेत असून संबंधित विभागांना याबाबत अवगत करण्यात आले आहे.
कोणत्याही कार्यालयात न जाता आपली तक्रार जिल्हा प्रशासन एका फोनवर विनम्रपणे ऐकूण घेते. त्याची सोडवणूक करते. याबाबत जिल्हयातील नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता असून शासन थेट एका फोन कॉलवर आपल्या सेवेत आल्याबद्दल अनेकांनी कौतुक केले आहे. दरम्यान काही असामाजिक घटकांकडून फोन स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास देणारे फोन कॉल्स जिल्हा प्रशासनाने नोंदवून घेतले आहे. संबंधितांचे नंबर यंत्रणेमध्ये उमटत असून या संदर्भात पोलीस यंत्रणेला माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या फोन कॉलचा दूरउपयोग करु नये, मोजक्या शब्दात व कमी वेळात आपली तक्रार मांडावी, अनेकांना म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
ही यंत्रणा सुरु केल्यानंतर पालकमंत्र्यांच्या पहिल्याच दौऱ्यात वरोरा, भद्रावती या तालुक्यातील कार्यक्रमांमध्ये जनतेने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत केले. ग्रामीण भागातील जनतेला या यंत्रणेमुळे थेट प्रशासनाशी संर्पक साधण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त होत आहे. याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा.

Web Title: Complaints about 'Hello Chanda'