बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 13:58 IST2025-06-15T13:57:15+5:302025-06-15T13:58:44+5:30

आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात वडिलांसाठी त्यांच्या मुलांबरोबर वेळ घालवणे मोठे आव्हान बनले आहे.

Fathers, don't just worry about earning money; giving your children time to succeed is equally important! | बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 

बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 

आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात वडिलांसाठी त्यांच्या मुलांबरोबर वेळ घालवणे मोठे आव्हान बनले आहे. मात्र, संशोधनात स्पष्ट झाले की, वडिलांनी मुलांबरोबर घालवलेला वेळ त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. मुलांच्या आयुष्यात वडील हे केवळ एक जबाबदार पालक नसून ते मार्गदर्शक आणि सुरक्षित भक्कम आधार असतात. जे वडील आपल्या मुलांच्या लहान-मोठ्या गोष्टींमध्ये सहभागी होतात, त्या मुलांमध्ये आत्मविश्वास अधिक असतो, ते भावनिकदृष्ट्या सुदृढ असतात. 

गैरवर्तनापासून दूर
वडिलांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मुले चुकीच्या वर्तनापासून दूर राहतात आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करतात. समाजात आत्मविश्वासाने वावरण्यात यशस्वी होतात. 

गुणवत्तापूर्ण वेळ, संवाद, सहवास, विश्वास गरजेचा
सहकुटुंब खेळ, संवाद किंवा अभ्यासात मदत अशा स्वरूपात घालवलेला गुणवत्तापूर्ण वेळ मुलांच्या मेंदूच्या आणि सामाजिक क्षमतेच्या विकासाला चालना देतो. या वेळेत होणारा सकारात्मक संवाद त्यांच्या विचारांना चालना देतो. जेवणानंतर किंवा झोपण्यापूर्वी १० मिनिटे तुमच्या मुलांशी गप्पा मारण्यात घालवा. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत लहान-मोठ्या ट्रिप आयोजित करा. त्यांच्यासोबत खेळा, फिरायला जा आणि त्यांना खरेदीमध्ये मदत करा.

वडिलांचा प्रेमळ स्पर्श देतो मुलांना भावनिक सुरक्षा
वडिलांचा प्रेमळ स्पर्श आणि पाठिंबा मुलांना भावनिक सुरक्षा प्रदान करतो. त्यामुळे त्यांना टेन्शन येत नाही किंवा ते त्याबाबत मोकळेपणाने बोलू शकतात. त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास सहज होतो. वडिलांशी घडणारा संवाद मुलांना आत्मविश्वास देतोच; शिवाय समस्या सोडवण्याकडे त्यांचा कल तयार करतो. अभ्यासाकडे गांभीर्याने पाहण्याची सवय लागते, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या शैक्षणिक यशावर  आणि भवितव्यावर होतो. 

Web Title: Fathers, don't just worry about earning money; giving your children time to succeed is equally important!