तुका म्हणे साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण

By Admin | Updated: January 26, 2015 00:49 IST2015-01-26T00:49:38+5:302015-01-26T00:49:38+5:30

बुलडाणा येथे राज्यस्तरीय भगवान ठग तुका म्हणे साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण.

Tuka's Theater Award | तुका म्हणे साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण

तुका म्हणे साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण

बुलडाणा : दरवर्षी विविध साहित्यिकांच्या साहित्यकृतीला दिला जाणार्‍या राज्यस्तरीय भगवान ठग तुका म्हणे साहित्य पुरस्काराचे शनिवारी थाटात वितरण झाले. बुलडाणा अर्बनच्या सहकार सेतू सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. रा.रं. बोराडे यांचे हस्ते व प्रख्यात उर्दू शायर डॉ. गणेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला. यावेळी प्रा. रा.रं. बोराडे यांनी आपल्या भाषणात मराठी साहित्य व मराठी भाषा अजरामर राहण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. व्यासपीठावर जि.प.चे उपाध्यक्ष पांडुरंगदादा खेडेकर, साहित्यिक डॉ. सदानंद देशमुख, अंकुर साहित्य संघाचे हिंमत शेगोकार उपस्थित होते.प्रारंभी संत तुकाराम व भगवान ठग यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाच्या संयोजिका शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी पुरस्काराची भूमिका विशद केली. तर प्रा. रा.रं. बोराडे यांच्या हस्ते डॉ. तीर्थराज कापगते नागपूर, मधुकर वडोदे (खामगाव), वृशाली आठल्ये (रत्नागरी), अनिल शेवाळकर (हिंगोली), डॉ. मोहन विष्णू खडसे (अकोला), लक्ष्मण काकरवार (यवतमाळ), नागनाथ गायकवाड (सोलापूर), बी.ए. कांबळे गुलबर्गा (कर्नाटक), डॉ. रेषा अकोटकर (अमरावती) या साहित्यिकांना स्मृतिचिन्ह तुकारामाचे हस्तक्षर, प्रमाणपत्र, रोख रक्कम शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संयोजन समितीचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गणेश गायकवाड यांनी समारोपीय भाषण केले. कार्यक्रमास परिसरातील सांस्कृतिक. साहित्य, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय खेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शिवदास भानुसे यांनी, तर आभार प्रदर्शन साहित्यिक सुरेश साबळे यांनी केले.

Web Title: Tuka's Theater Award