आरोपींच्या पोलीस कोठडीत तिसऱ्यांदा वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:33 AM2021-05-15T04:33:47+5:302021-05-15T04:33:47+5:30

बुलडाणा शहरातील दोन नामांकित रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांनी बनावट रेमडेसिविरची विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात पोलिसांनी राम गडाख, ...

Third increase in police custody of accused | आरोपींच्या पोलीस कोठडीत तिसऱ्यांदा वाढ

आरोपींच्या पोलीस कोठडीत तिसऱ्यांदा वाढ

Next

बुलडाणा शहरातील दोन नामांकित रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांनी बनावट रेमडेसिविरची विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात पोलिसांनी राम गडाख, लक्ष्मण तरमळे, संजय इंगळे या तिघांना जांभरून रोड आणि येळगाव फेटा येथून अटक केली होती. त्यांच्याकडून रेमडेसिविर इंजेक्शनसह रोख सात हजार रुपये, दोन दुचाकी व अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास बुलडाणा शहर पोलिसांकडे देण्यात आला होता. ८ मे रोजी आरोपींना बुलडाणा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची १० मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची १४ मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली होती. १४ मे रोजी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने न्यायालयाने त्यांना पुन्हा तीन दिवसांची अर्थात १७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एक ओरिजनल आणि आठ बनावट रेमडेसिविर इंजेक्शन या आरोपींकडून जप्त केले होते. ते त्यांनी कोठून मिळविले, या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे. संबंधित दोन नामांकित रुग्णालयातील आणखी काही व्यक्तींचा या प्रकरणाशी संबंध आहे का? याचा तपास सध्या बुलडाणा शहर पोलीस करत आहेत. एफडीएकडून ही कथित स्तरावरील बनावट रेमडेसिविरचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले आहे. त्याच्या अहवालाची सध्या प्रतीक्षा आहे.

--तपासाबाबत अधिकच गोपनीयता--

या प्रकरणात नेमका तपास काय चालू आहे. नामांकित रुग्णालयातील आणखी काही व्यक्तींची चौकशी झाली आहे. यासंदर्भात तपासी अधिकारी एपीआय अभिजित अहिराव यांनी बोलणे टाळले. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात बुलडाणा पोलीस अधिकच गोपनीयता बाळगत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच सलग तिसऱ्यांदा आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रकरण नेमके कोणते वळण घेते याकडे लक्ष लागून आहे.

Web Title: Third increase in police custody of accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.