धक्कादायक! राज्य सरकारचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या; सणादिवशीच मृत्यूला कवटाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 14:01 IST2025-03-13T14:01:11+5:302025-03-13T14:01:46+5:30
Maharashtra Farmer Suicide: युवा शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत विषारी औषध पिऊन आपलं जीवन संपवलं.

धक्कादायक! राज्य सरकारचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या; सणादिवशीच मृत्यूला कवटाळले
Buldhana Farmer Suicide: राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त तरुणाने सुसाईड नोट लिहीत मृत्यूला कवटाळल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या तालुक्यात घडली आहे. कैलास नागरे असं या युवा शेतकऱ्याचं नाव असून माझ्या आत्महत्येस सरकार कारणीभूत असल्याचं नागरे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्यासाठी लढा देऊनही सकारात्मक प्रतिसाद न देण्यात आल्याने मी हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचा उल्लेख या नोटमध्ये आढळून आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथील शिवनी आरमाळ शिवारात कायमच पाण्याची चणचण जाणवते. ही समस्या दूर व्हावी यासाठी कैलास नागरे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन उभारले होते. यंदा ओव्हरफ्लो झालेल्या खडकपूर्णा धरणातून शिवनी आरमाळ येथील पाटबंधारे विभागाच्या लघु प्रकल्पात पाणी सोडावे, अशी नागरे यांची मागणी होती. विशेष म्हणजे आंदोलनानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी कैलास नागरे यांना पाणी सोडण्याबाबत लेखी आश्वासनही दिले होते. परंतु मार्च महिना उजाडला तरी ही मागणी मान्य न करण्यात आल्याने अखेर या युवा शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत विषारी औषध पिऊन आपलं जीवन संपवलं.
"पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा आणि..."
कैलास नागरे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय की, "आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत. परंतु तरीही पाणी येत नाही. माझ्यावर आता केळी आणि पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा व राख आनंदस्वामी धरणात टाका. मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारावं. माझ्या मुलांचे शिक्षण करण्यासाठी मी असमर्थ ठरलो... स्वतः शून्य झालो."
दरम्यान, आधुनिक पद्धतीने शेती करण्याची आवड असलेला आणि राज्य सरकारने पुरस्कार देऊन गौरन्वित केलेल्या शेतकऱ्यानेच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.