राष्ट्रवादीतील गटबाजी अजित पवारांच्या दरबारात

By Admin | Updated: December 6, 2014 00:08 IST2014-12-06T00:08:02+5:302014-12-06T00:08:02+5:30

खामगाव येथील काँग्रेस भवन राष्ट्रवादीच्या ताब्यात

NCP's grouping in Ajit Pawar's courtroom | राष्ट्रवादीतील गटबाजी अजित पवारांच्या दरबारात

राष्ट्रवादीतील गटबाजी अजित पवारांच्या दरबारात

अनिल गवई / खामगाव ( बुलडाणा)
लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या घडाळ्याची टिकटिक कमालीची मंदावली आहे. या पराभवाचा कोणताही बोध राष्ट्रवादीचे पदाधिकारी घेत नसल्याचे चित्र असतानाच शहरातील गटबाजी आता थेट अजित पवारांच्या दरबारात पोहोचल्याची खात्रीलायक माहिती आहे. परस्पर विरोधी गटांनी एकमेकांविरोधात दंड थोपटल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे.
खामगाव शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटबाजीने पोखरल्या गेला आहे. गटा तटाच्या राजकारणात कुणीही माघार घ्यायला तयार नाही. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला दारुण पराभव पत्करावा लागला. जिल्ह्यातील राष्ट्रवादीची टिकटिक बंद पडली आहे. जिल्ह्यासह तालुका आणि खामगाव शहरातील पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही निष्ठावान पदाधिकार्‍यांनी प्रयत्न चालविले आहेत. खामगाव शहर राष्ट्रवादीतील गटबाजीला संपुष्टात आणण्याचे साकडे त्यांनी अजित पवारांना घातले.
यावेळी गटबाजीमुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत झालेल्या नुकसानाचा पाढाच वाचण्यात आला. पक्ष रसातळाला नेण्यासाठी गटबाजी कशी कारणीभूत आहे, याची तंत्रशुद्ध माहिती आकडेवारीसह अजित पवारांकडे देण्यात आली. त्यामुळे गटबाजीला वेसण घालण्यासाठी राष्ट्रवादीच्या शीर्ष नेतृत्वाने प्रयत्न चालविल्याचे समजते. पुढे ही गटबाजी कोण त्या स्थराला जाते, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

Web Title: NCP's grouping in Ajit Pawar's courtroom