जिजाऊ जन्मोत्सवाची जय्यत तयारी

By Admin | Updated: January 11, 2015 00:33 IST2015-01-11T00:23:14+5:302015-01-11T00:33:21+5:30

सिंदखेडराजा येथे आज दीपोत्सव.

Jijau Janmotsav Jayyil Preparation | जिजाऊ जन्मोत्सवाची जय्यत तयारी

जिजाऊ जन्मोत्सवाची जय्यत तयारी

सिंदखेडराजा : स्थानिक जिजाऊ सृष्टीवर मराठा सेवा संघाच्यावतीने जिजाऊ मासाहेब यांचा ४२१ वा जन्मोत्सव १२ जानेवारी रोजी मोठय़ा उत्साहात पार पडणार आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, ११ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मस्थळी दीप प्रज्वलीत करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यावरील जिजाऊ जन्मस्थळी ११ जानेवारी रोजी सिंदखेडराजा येथील महिला एक पणती व एक मेणबत्ती लावून दीपोत्सव साजरा करणार आहेत. यावेळी किमान ५0 हजार पणत्या लावण्यात येणार असून, या दीपांच्या झगमगाटाने राजवाड्याचे वैभव खुलून दिसणार आहे. सायंकाळी राजवाड्यावरून ४२१ मशाली घेऊन भव्य मशाल यात्रा काढण्यात येणार आहे. ती मशाल यात्रा सावकारवाडा, काळा कोट, रंगमहाल, रामेश्‍वर मंदिर, राजे लखोजीराव जाधव, जन्मस्थळ, मोती तलाव अश्या ऐतिहासिक स्थळी जाणार आहे. त्याचे नेतृत्व जिजाऊंचे वंशज अँड. निशिकांत राजे जाधव हे करणार आहेत. त्यानंतर जिजाऊ सृष्टीवर जाऊन मशाल यात्रेचा समारोप होणार आहे. दुसर्‍या दिवशी १२ जानेवारीला सूर्योदयापूर्वी सकाळी ६ वाजता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ढोल-ताश्यांच्या गजरात जिजाऊंचे पूजन यावेळी करण्यात येणार आहे. त्यानंतर राजवाडा ते जिजाऊसृष्टीपर्यंत जिजाऊंची पालखी निघणार आहे. या पालखी सोहळ्यात वेशभुषा करुन अनेक युवक, युवती सहभागी होणार आहेत.

Web Title: Jijau Janmotsav Jayyil Preparation