शासकीय कार्यालयांमध्येच पाणीटंचाई!

By Admin | Updated: April 24, 2017 00:22 IST2017-04-24T00:22:35+5:302017-04-24T00:22:35+5:30

शहरात येणाऱ्या नागरिकांना भागवावी लागते पाणपोईवर तहान

Government offices, water shortage! | शासकीय कार्यालयांमध्येच पाणीटंचाई!

शासकीय कार्यालयांमध्येच पाणीटंचाई!

खामगाव : तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची शासकीय कामकाजानिमित्ताने शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी असते. मात्र, तालुक्याचे काम पाहणाऱ्या तालुकास्तरीय कार्यालयांमध्येच पाणीटंचाई भासत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी थंड पाण्याची सुविधा आहे. मात्र, येथे येणाऱ्या नागरिकांना पाणी पिण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे नागरिकांना भर उन्हात पाणी पिण्यासाठी हॉटेल वा इतर ठिकाणाचा शोध घ्यावा लागतो. किंवा विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.
खामगाव शहर हे जिल्ह्यातील सर्वात मोठे लोकसंख्येचे तालुक्याचे ठिकाण असलेले शहर आहे. मात्र, शहरातील शासकीय कार्यालये शहरभर विखुरल्याने नागरिकांना गैरसोयीचे होत आहे. त्यामुळे शहरात भव्य अशा प्रशासकीय इमारतीचे निर्माण करण्यात आले आहे.
या इमारतीमध्ये अनेक शासकीय कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र, याठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा अद्याप निर्माण करण्यात आलेली नाही. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडता येत नसल्याने त्यांच्यासाठी आरओ थंड पाणी बोलावून त्यांनी त्यांची पाण्याची गरज भागविली आहे. मात्र, येथे येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे नागरिकांना या कार्यालयाबाहेर असलेल्या हॉटेलवर चहा, नाश्ता घेऊन पाणी मिळवावे लागते किंवा पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. सामाजिक संस्थेच्या मदतीतून मुद्रांक नोंदणी विभागाचा अपवाद वगळता, तर नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा अन्य कोणत्याही शासकीय कार्यालयांमध्ये दिसून येत नाही.

पोलीस स्टेशन आवारातील टाकीतही ठणठणाट!
शहरातील शहर पोलीस स्टेशन हे रहदारीच्या रस्त्यावर आहे. तसेच दरवर्षीच उन्हाळा खामगावकरांसाठी तापदायक ठरत असतो. शहरातील तापमान वाढते राहते असल्याने पाणी पिण्याची सुविधा व्हावी, यासाठी शहर पोलीस स्टेशनसमोर अद्ययावत पाणपोई उभारण्यात आली आहे. मात्र आजरोजी या पाण्याच्या टाकीतही ठणठणाट आहे. त्यामुळे झालेला खर्च व्यर्थ ठरत असून, आशेने पाणी पिण्यासाठी आलेला इसम नळाची तोटी फिरविल्यानंतर पाणी नसल्याचे समजून तसाच चालता होतो.

Web Title: Government offices, water shortage!