सराफा दुकान फोडले

By Admin | Updated: September 4, 2015 23:56 IST2015-09-04T23:56:30+5:302015-09-04T23:56:30+5:30

चिखली येथील २ लाख १0 हजारांचे दागिने लंपास.

The bullion shop opened | सराफा दुकान फोडले

सराफा दुकान फोडले

चिखली (जि. बुलडाणा) : येथील राजा टॉवर परिसरातील सराफा दुकानाचे कुलूप तोडून काळय़ा कपड्यातील चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास घडली. याच परिसरातील सराफा दुकानात चोरीची ही लागोपाठ दुसरी घटना आहे. त्यामुळे सराफा व्यावसायिकांमाध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे. स्थानिक राजा टॉवर परिसरातील अमोल वर्धमान डहाळे यांच्या सिद्धविनायक ज्वेलर्स या सराफा दुकानात गुरुवार, ३ सप्टेंबरच्या रात्री काळय़ा कपड्यातील चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी प्रवेश घेतला. त्यांनी दुकानास लावलेले कुलूप व मुख्य दरवाजा तोडून सुमारे २ लाख १0 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागीने लंपास केले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर, सहायक पोलीस अधीक्षक श्‍वेता खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व श्‍वानपथकास पाचारण करण्यात आले होते; मात्र रात्री पाऊस पडल्यामुळे श्‍वानपथक फारसे उपयोगी पडले नाही. शहरातील सराफा दुकानात लागोपाठ झालेल्या दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांचे कृत्य सी.सी. कॅमेर्‍यात कैद झाले आहे; मात्र पहिल्या चोरीत महिला बुरखाधारी होत्या, तर आजच्या घटनेतील चोरांनीदेखील तोंडाला काळे कपडे बांधले असल्यामुळे त्यांची ओळख पटणे अवघड झाले आहे. अमोल डहाळे यांच्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गत २३ ऑगस्ट रोजी याच परिसरातील टेहरे यांच्या दुकानात भरदिवसा बुरखाधारी महिलांनी हात साफ केला होता. त्यापश्‍चात शुक्रवारी घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे सराफा व्यावसायिकांसह इतर व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी शेख यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार राजपूत प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: The bullion shop opened