Water Crisis: भंडाऱ्यातील जलप्रकल्प आटले; मे-जूनमध्येच पाणीटंचाईची संकट
By युवराज गोमास | Updated: April 17, 2026 19:37 IST2026-04-17T19:34:15+5:302026-04-17T19:37:27+5:30
भंडारा जिल्ह्यात ग्रामीण भागात काही उथळ विहिरी एप्रिलच्या प्रारंभीस कोरड्या पडल्या आहे. लहान तलाव-बोड्या आटल्याने पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे.

Water Crisis: भंडाऱ्यातील जलप्रकल्प आटले; मे-जूनमध्येच पाणीटंचाईची संकट
-युवराज गोमासे, भंडारा
भंडारा जिल्ह्यात तापमानाने ४२ अंशांचा टप्पा ओलांडल्याने उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून बाष्पीभवनाचा वेगही झपाट्याने वाढला आहे. परिणामी, जिल्ह्यातील जलसंकट अधिकच गडद झाले आहे. सिंचन, पिण्याचे पाणी आणि इतर वापरासाठी उपयुक्त असलेल्या ६३ लहान-मोठ्या जलप्रकल्पांमधील एकूण उपयुक्त जलसाठा केवळ ४२ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी याच काळात हा साठा ८८.८४ टक्के होता, त्यामुळे यंदाची स्थिती निम्म्याहूनही कमी राहिल्याने चिंता वाढली आहे.
एप्रिल महिना अर्धाही सरला नसताना पाणीसाठ्यात झालेली ही घसरण प्रशासन, शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. सध्याची स्थिती अशीच राहिल्यास मे आणि जून महिन्यात जिल्ह्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पांची अवस्था विशेष चिंताजनक आहे. या प्रकल्पांमध्ये सरासरी केवळ २८.६४ टक्के जलसाठा शिल्लक आहे, तर गेल्या वर्षी याच काळात हा साठा ८० टक्क्यांहून अधिक होता.
चार मध्यंम प्रकल्पातील स्थिती अतिशय गंभीर
बघेडा प्रकल्पात फक्त ९.३६ टक्के, चांदपूरमध्ये २८.७४ टक्के, बेटेकर बोधलीमध्ये ३१.५३ टक्के आणि सोरनात ४१.४८ टक्के पाणी उरले आहे.
या घटत्या साठ्याचा थेट परिणाम उन्हाळी पिकांवर होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शेवटच्या गरजेच्या टप्प्यावरच प्रकल्पांतील जलसाठा आटत असल्याने उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असे चित्र आहे.
विहिरी आटल्या, जनावरांसाठी जलसंकट
ग्रामीण भागात गावातील तसेच शेतशिवारातील विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची घट दिसत आहे. काही उथळ विहिरी एप्रिलच्या प्रारंभीस कोरड्या पडल्या आहे. लहान तलाव-बोड्या आटल्याने पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे.
मामा तलावांची स्थितीही दिलासादायक नाही
जिल्ह्यातील २८ माजी मालगुजारी म्हणजेच मामा तलावांची स्थितीही फारशी दिलासादायक नाही. या तलावांमध्ये सरासरी ५१.९८ टक्के जलसंग्रहण शिल्लक आहे. त्याचवेळी साकोलीजवळील कुंभली जलाशयात केवळ १९.६७ टक्के पाणी आहे, तर लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव जलाशयात ९४.१७ टक्के साठा असल्याने त्या परिसराला काहीसा दिलासा मिळाला आहे.
हिवरा प्रकल्प कोरडा, सिल्ली-आंबाडी लबालब
लघुप्रकल्पांची स्थितीही बिकट बनत चालली आहे. जिल्ह्यातील ३१ लघुप्रकल्पांमध्ये सध्या केवळ ४७.९४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यापैकी २० प्रकल्पांतील पातळी ५० टक्क्यांखाली गेली आहे. हिवरा प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडला आहे, तर सिल्ली आंबाडी प्रकल्पात तुलनेने ९५.८८ टक्के पाणी उपलब्ध आहे. मात्र, वाढत्या तापमानामुळे पुढील काही आठवड्यांत ही स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तलावाच्या जिल्ह्यात पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.