राजू बांते लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा, यासाठी शाळाशाळांमध्ये द्वंद्व सुरू झाले आहे. काही शाळांनी तर आमच्या शाळेत प्रवेश घेतला नाही तर अकरावी प्रवेश देणार नाही, असा दम पालक व विद्यार्थ्यांना दिला जात असल्याची माहिती आहे. स्वाभाविकच विद्यार्थी प्रवेशासाठी शिक्षकांमध्ये घमासान बघायला मिळत आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. विद्यार्थी आपल्याच शाळेत यावा, यासाठी मार्च महिन्यापासूनच शिक्षकांनी पालकांची भेट घेण्याचे सत्र सुरू केले आहे. शाळांतर्गत परीक्षा संपल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला प्रचंड वेग आला आहे. वर्षभर भेटी न घेणारे शिक्षक दारावर जात आहेत. पालक व विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी शिक्षकांचे जत्थे गावागावात फिरत आहेत. याशिवाय साम दाम दंड भेद नीतीचा वापर करीत आहे. एवढ्यावरच काही शाळांचे शिक्षक थांबले नाहीत. आमच्याकडे अकरावी, बारावी आहे. पाचव्या आठव्या वर्गात 'आमच्या शाळेत प्रवेश घेतला नाही तर तुम्हाला अकरावी प्रवेश मिळणार नाही' अशी भीती काही शाळा पालक व विद्यार्थ्यांना देत आहेत. मुला-मुलींचे अॅडमिशन कोणत्या शाळेत करावे, या संभ्रमात पालकवर्ग पडला आहे. स्वाभाविकच विद्यार्थी व पालकांचे वैचारिक स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न शिक्षक करीत आहेत. विद्यार्थी प्रवेशावरून शिक्षकांच्या स्पर्धेत विद्यार्थीही गोंधळात पडलेली दिसून येत आहेत.
दाखल्याच्या किमती ठरल्याविद्यार्थ्यांचे दाखले हाती येण्यासाठी शिक्षकांमध्ये युद्ध लढले जात आहे. याचाच फायदा काही पालक घेतात. शिक्षक आणि पालक दाखल्यांचा रेट आधीच ठरवून घेतला जातो. त्याप्रमाणे निकालापूर्वी 'अर्थ' कारणाची पूर्तता शिक्षकांना करावी लागत आहे. यात पाल्यांची मात्र गोची होत आहे.
आमिषाची पेरणीशाळेत आमच्याकडेच सोयी आहेत. याशिवाय येण्या-जाण्याची सोय करू, साधन - साहित्य देऊ, एवढेच नाही तर जे मागाल ते देऊ, परंतु आपला मुलगा आमच्या शाळेत पाठवा, असे आमिष दाखवले जात आहे.
पालक म्हणतात,प्रत्येक शाळेतील शिक्षक प्रवेशाची निर्धारित संख्या जुळवण्यासाठी फिरत आहेत. काही शिक्षकांमध्ये आपसात वाद होत आहे. शिक्षकवर्ग विद्यार्थी प्रवेश संख्या पूर्ण करण्यासाठी धडपड करीत असला तरी स्पर्धात्मक प्रवेशासारख्या बाबी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर लादल्या जाऊ नयेत, अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
संस्था चालकांचा शिक्षकांवर दट्टयाखासगी शाळांच्या संस्थाचालकांनी शिक्षकांना विद्यार्थी प्रवेशाचे उद्दिष्ट दिल्याचे समजते. तसे शाळा व नोकरी टिकवण्याचे काम शिक्षकच करत आहेत. त्यामुळे विविध शाळांमधील शिक्षकांमध्ये प्रचंड द्वंद्व सुरू आहे. दुसरीकडे संस्थाचालक विद्यार्थी प्रवेशासाठी सक्रिय झाले आहेत. ते म्हणतात, 'विद्यार्थी प्रवेशाचे उद्दिष्ट पूर्ण केले नाही तर बघा...' अशी धमकीसुद्धा दिली जात असल्याचे एका शिक्षकाने नाव सांगण्याच्या अटीवर सांगितले.
५ व ८ वर्गात शाळा प्रवेशासाठी शिक्षक फिरतात दारोदारपरीक्षा आटोपल्या आहेत. निकाल लागण्यापूर्वीच पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांचे जत्थे गावोगावी विद्यार्थ्यांसाठी फिरत असल्याचे सध्या चित्र आहे.
"अकरावी इयत्तेच्या प्रवेशासाठी भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणतीही शाळा वंचित ठेवू शकणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने पुढील वर्गात प्रवेश घ्यावा."- शरद कुकडकर, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, मोहाडी