Stop the Shiv Sena's route at Kondha for state highway work | राज्यमार्ग कामासाठी कोंढा येथे शिवसेनेचा रास्ता रोको
राज्यमार्ग कामासाठी कोंढा येथे शिवसेनेचा रास्ता रोको

ठळक मुद्देवाहतूक ठप्प : कामाच्या संथगतीने अपघाताची वाढली भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा-कोसरा : भंडारा - पवनी-निलज या राज्यामार्गाचे काम सध्या संथगतीने होत असून ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. रस्त्यावर धूळ उडत आहे. रस्ता खोदून ठेवल्याने आतापर्यंत निरपराध लोकांना जीव गमवावा लागला आहे. या राज्यमार्गाचे काम बांधकाम कंपनीने वेगाने करावे, बांधकामात चांगल्या दर्जाचे साहित्य वापरण्यात येऊन बंद असलेले काम त्वरीत सुरु करण्यात यावे यासाठी कोंढा-कोसरा येथे भंडारा, पवनी तालुका शिवसेनेतर्फे गुरूवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व नवनिर्वाचित आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले. यावेळी पवनी तालुका शिवसेनाप्रमुख विजय काटेखाये, भंडारा तालुका प्रमुख अनिल गायधने, भंडारा विधानसभा प्रमुख राजु ब्राम्हणकर, माजी सरपंच शिवाजी फंदी, उपजिल्हा प्रमुख अनिल धकाते, नरेश बावनकर, प्रशांत भुते, देवराज बावनकर, सरपंच शेवंता जुगनाके, महिला शिवसेना तालुका आघाडी प्रमुख भाग्यश्री गभने, प्रकाश मानापुरे, ज्ञानदेव कुर्झेकर, युवा जिल्हा प्रमुख जितेंद्र ईखार, उपसरपंच जितेंद्र लिचडे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या निधीतून या राज्यमार्गाचे काम होत असताना केंद्र शासनाचे लोकप्रतिनिधी राजकारण करीत नाही. लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. तेव्हा कंत्राटदार कामात दिरंगाई करीत असेल तर समज देऊन काम वेळेत पूर्ण करीत नसेल त्याचे नाव काळ्या यादीत घालावे, नागरिकांच्या जीवाशी व आरोग्याशी खेळू नये, असे यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले. बांधकाम कामावर स्थानिक कामगार, जेसीबी, ट्रॅक्टर यांचे अनेक दिवसांपासून कंत्राटदाराने पेमेंट केले नाही ते देण्यात यावेश अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार चौधरी यांनी स्विकारले. कंत्राटदाराने ५ डिसेंबरपर्यंत कामात सुधारणा करीत राज्यमार्गाचे काम वेगाने करावे. कच्चा रस्त्यावर दररोज टँकरद्वारे पाणी घालावे, या मागणीवर विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिवसैनिकांनी यावेळी दिला. अड्याळचे पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचीत घटना घडली नाही.

Web Title: Stop the Shiv Sena's route at Kondha for state highway work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.