कोरोना योध्दांसाठी धावून आले ‘राम-जानकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:00 AM2020-08-05T05:00:00+5:302020-08-05T05:00:24+5:30

चीनच्या वुहान शहरातून जगभर कोरोना पसरला. भंडारा जिल्हाही त्याला अपवाद नाही. प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लॉकडाऊन घोषीत केले. हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. लघुउद्योग आणि व्यवसायीकांनाही मोठा फटका बसला. भंडारा येथे शिंपी व्यवसाय करणारे राम घोटेकर यांचाही व्यवसाय जवळजवळ बंदच होता. या काळात त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण झाला.

'Ram-Janaki' runs for Corona Warriors | कोरोना योध्दांसाठी धावून आले ‘राम-जानकी’

कोरोना योध्दांसाठी धावून आले ‘राम-जानकी’

googlenewsNext
ठळक मुद्देदोन हजार मास्कचे नि:शुल्क वितरण : लॉकडाऊनने व्यवसाय ठप्प पण टेलर दाम्पत्याचा समाजसेवेचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीत अनेक छोटेमोठे व्यवसाय ठप्प झाले. टेलरिंग व्यवसायालाही त्याचा मोठा फटका बसला. मात्र भंडारा शहरातील ‘राम-जानकी’ या दांपत्याने कोणताही बाऊ न करता या काळात मास्क तयार करून पोलिसांना नि:शुल्क वितरीत केले. लॉकडाऊनच्या काळात तब्बल दोन हजार मास्क वितरीत करून त्यांनी खऱ्या अर्थाने कोरोना योद्धाची भूमिका बजावली. व्यवसायाने शिंपी असलेले दांपत्य आहेत राम घोटेकर आणि त्यांची पत्नी जानकी घोटेकर. त्यांच्या या कार्याचा पोलीस अधीक्षकांनीही गौरव केला.
चीनच्या वुहान शहरातून जगभर कोरोना पसरला. भंडारा जिल्हाही त्याला अपवाद नाही. प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लॉकडाऊन घोषीत केले. हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. लघुउद्योग आणि व्यवसायीकांनाही मोठा फटका बसला. भंडारा येथे शिंपी व्यवसाय करणारे राम घोटेकर यांचाही व्यवसाय जवळजवळ बंदच होता. या काळात त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण झाला. परंतु कोणताही बाऊ न करता यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु ठेवला. अशातच त्यांच्यातील समाजसेवक जागरुक झाला.
कोरोनाच्या काळात रात्रंदिवस काम करणाºया कोरोना योद्धांच्या सुरक्षितेसाठी काय करता येईल असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. पत्नी जानकीच्या प्रोत्साहनाने त्यांनी मास्क शिवण्याचा निर्धार केला. कापडी मास्क ते तयार करू लागले. यात त्यांना त्यांची पत्नी जानकी, बारा वर्षाची मुलगी आदिती, १० वर्षाचा मुलगा रोशन यांचे सहकार्य मिळू लागले. तयार झालेले मास्क वेळोवेळी त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना नि:शुल्क वितरीत केले. पोलिसांनाही त्यांनी मास्क देऊन त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था केली.
एकीकडे व्यवसाय ठप्प आणि दुसरीकडे नि:शुल्क मास्कचे वितरण राम करीत आहे. कुटुंबाचा गाढा ओढताना अनेक वेळा परिस्थितीशी झगडावे लागले. मात्र त्याचा कुठेही बाऊ न करता त्यांचा हा समाजसेवेचा उपक्रम सुरु आहे.

पोलीस अधीक्षकांकडून गौरव
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासह भंडारा शहर, कारधा, मोहाडी, तुमसर, अड्याळ, वरठी या पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन राम घोटेकर यांनी नि:शुल्क कापडी मास्कचे वितरण केले. स्वयंप्रेरणेने आणि नि:स्वार्थपणे सुरु असलेल्या कार्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्यापर्यंत पोहचली. त्यांनी राम घोटेकर यांना आपल्या कार्यालयात बोलावून विशेष सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. एखादा लहानसा व्यवसायीकही मनात आणले तर समाजसेवेचे व्रत कशा पद्धतीने करू शकतो याचे उदाहरण राम आणि जानकीच्या रुपाने भंडारा शहरात दिसत आहेत.

Web Title: 'Ram-Janaki' runs for Corona Warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.