स्थलांतरित पक्षी ‘पट्टकादंब’ भंडाऱ्यात मुक्कामी

By Admin | Updated: February 24, 2016 00:37 IST2016-02-24T00:37:13+5:302016-02-24T00:37:13+5:30

तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी परदेशी पाहुणे हजेरी लावतात.

Migratory Bird Pactakam | स्थलांतरित पक्षी ‘पट्टकादंब’ भंडाऱ्यात मुक्कामी

स्थलांतरित पक्षी ‘पट्टकादंब’ भंडाऱ्यात मुक्कामी

हजारो किमीहून आलेले पक्षी परतीच्या मार्गावर
भंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी परदेशी पाहुणे हजेरी लावतात. हिवाळा सुरु होताच परदेशात बर्फाचे आच्छादन पसरते व त्यामुळे या पक्ष्यांना त्यांचे भक्ष्य मिळणे कठीण होते. भक्ष्यांच्या शोधार्थ हे पक्षी हजारो किलोमीटरचे अंतर उडून भारतात येतात. भंडारा जिल्ह्यात यावर्षी दुर्मिळ परदेशी पाहुन्यांनी हजेरी लावली असून पट्टकादंब नावाचा दुर्मिळ पाहुण्याची भंडारा जिल्ह्यात नोंद झाली आहे.
पट्टकादंब हा पक्षी भारतीय ‘हंसा’ सारखा असतो. त्याला सामान्यपणे ‘बार हेडेड गुस’ या नावाने ओळखले जाते. संस्कृतच्या वेदांमधील उल्लेखामुळे त्याला ‘कादंब’ हे नाव पडले. या पक्ष्याच्या डोक्यामागील काळ्या आडव्या खुणांमुळे त्याला ‘पट्ट’ हे नाव देण्यात आले. या पक्ष्यांचे मुख्य वास्तव्य कजाकिस्तान, तिब्बत, मंगोलिया आणि रूस असून ते भारतात हिमालय ओलांडून प्रवेश करतात.
‘पट्टकादंब’ हा जगातील सर्वात उंच उडणाऱ्या पक्ष्यांमधून एक असून तो मकालू पर्वतावरून उडत येतो. या पर्वताची उंची २७,८०० फुटांपेक्षाही जास्त आहे. माऊंट एवरेस्ट पर्वतावरून उडत आल्याचीही नोंद आहे. एवढ्या उंचीवरून उडताना त्याला हवेतील केवळ १० टक्के आॅक्सीजनची गरज असते. संपूर्ण हिवाळा महिना संपल्यावर या पक्ष्याचे केवळ भंडारा तालुक्यात दर्शन होणे म्हणजे पक्षीप्रेमींना पर्वणी ठरली आहे. पक्षीप्रेमी स्वप्निल वानखेडे, निलय नागदेवे, डॉ.स्वप्निल धारगावे या पक्षीप्रेमींना प्रथमत:च ‘पट्टकादंब’चे दर्शन झाले आहे. जानेवारी महिन्यात वरठीनजिकच्या पाचगाव तलावात आलेल्या स्थलांतरीत पक्ष्याची शिकार झाली होती. स्थलांतरीत पक्ष्यांची शिकार झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या दुर्मिळ पक्ष्याच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन जागेबद्दल गोपनीयता बाळगा, असे वनविभागाने सांगितल्याचे पक्षीप्रेमी स्वप्निल वानखेडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Migratory Bird Pactakam