भूमिपूजनानंतर तब्बल ३४ वर्षांनी भरला गोसेखुर्द प्रकल्प; २४५.५० मीटर जलपातळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 08:37 PM2022-01-11T20:37:37+5:302022-01-11T20:41:36+5:30

Bhandara News अडीच लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प निर्मितीनंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला. मंगळवारी सकाळी या प्रकल्पाची जलपातळी २४५.५० मीटर नोंदविण्यात येऊन प्रकल्पात ७४०.१६८ दशलक्ष घनमीटर जलसाठा झाला आहे.

Gosekhurd project at full capacity for the first time; 245.50 m water level | भूमिपूजनानंतर तब्बल ३४ वर्षांनी भरला गोसेखुर्द प्रकल्प; २४५.५० मीटर जलपातळी 

भूमिपूजनानंतर तब्बल ३४ वर्षांनी भरला गोसेखुर्द प्रकल्प; २४५.५० मीटर जलपातळी 

Next
ठळक मुद्दे ७४०.१६८ दशलक्ष घनमीटर जलसाठा

ज्ञानेश्वर मुंदे

भंडारा : अडीच लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेला ‘इंदिरासागर जलाशय’ अर्थात गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प निर्मितीनंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला. मंगळवारी सकाळी या प्रकल्पाची जलपातळी २४५.५० मीटर नोंदविण्यात आली. यावेळी प्रकल्पात ७४०.१६८ दशलक्ष घनमीटर जलसाठा झाला आहे. या प्रकल्पाच्या निर्धारित २२२.५८ वर्ग किलोमीटर बुडित क्षेत्राच्या बाहेरही बॅकवाॅटर शिरले आहे.

पवनी तालुक्यातील गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. २२ एप्रिल १९८८ रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. २००९ पासून जलसाठा करण्यास प्रारंभ झाला. परंतु पुनर्वसनाचे काम अपूर्ण होते.

त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यास अडचण येत होती. आता पुनर्वसनाचे काम पूर्ण झाल्याने १ नोव्हेंबर २०२१पासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवार, ११ जानेवारी रोजी २४५.५० मीटर जलपातळी झाली आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे आता या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने सिंचन होण्याची अपेक्षा आहे.

भंडारा जिल्ह्यातील ३४ गावे पूर्णत: बाधित

या प्रकल्पात भंडारा जिल्ह्यातील ३४ पूर्णत: तर अंशत: १०४ गावे, नागपूर जिल्ह्यातील ८५ गावे बाधित झाली आहेत. भंडारा जिल्ह्यातील १२ हजार ४७५ हेक्टरपैकी १२ हजार ३६१ हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे, तर नागपूर जिल्ह्यातील ३३.३६ हेक्टरपैकी २७.६६ हेक्टर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील २६८२ हेक्टर जमिनीपैकी २ हजार ६३२ हेक्टर शेतजमीन संपादित झाली आहे.

अडीच लाख हेक्टर सिंचन क्षमता

तीन जिल्ह्यांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पाची सिंचन क्षमता अडीच लाख हेक्टर आहे. या प्रकल्पात भंडारा जिल्ह्यातील ८९ हजार ८५६ हेक्टर, नागपूर जिल्ह्यातील १९ हजार ४८१ हेक्टर, तर चंद्रपूर जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ४६३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. प्रकल्पाला दोन कालवे असून, डाव्या कालव्याची लांबी २३ किलोमीटर, तर उजव्या कालव्याची लांबी ९९ किलोमीटर आहे.

बॅकवाॅटरची समस्या वाढली

गोसेखुर्द प्रकल्पात १ नोव्हेंबरपासून पाणी साठविण्यास प्रारंभ झाला. हळूहळू पाण्याची पातळी वाढायला लागली आणि बॅकवाॅटरची समस्या निर्माण झाली. बुडित क्षेत्रातील अनेक गावांतील शेतजमिनीसह रस्त्यांवर पाणी शिरले आहे. भंडारा शहरातील काही वसाहतीमध्येही बॅकवाॅटर शिरले आहे. निर्धारित बुडित क्षेत्राबाहेर शिरलेल्या बॅकवाटरचे सर्वेक्षण ड्रोन कॅमेऱ्याद्वारे केले जाणार आहे.

कालवा उशाशी पण शेतकरी उपाशी !

गाेसेखुर्द प्रकल्पाच्या डावा आणि उजवा कालव्याचे काम पूर्ण झाले असले तरी उपकालवे आणि पाटसऱ्यांचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे गाेसेखुर्दचे पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाेहाेचले नाही. डाव्या कालव्याची लांबी २३ किमी असून, ताे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात जाताे. उजवा कालवा ९९ किमीचा असून, पवनी, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही तालुक्याला सिंचनाचा लाभ हाेणार आहे. कधी कंत्राटदाराचे अडथळे, कधी निधीची कमतरता अशा अनेक अडचणी या मार्गात आल्या आहेत. आता पूर्ण प्रकल्प भरला तरी उपकालवे आणि पाटसऱ्यांअभावी शेतकऱ्यांपर्यंत पाणी पाेहाेचण्याची शक्यता कमी आहे. लवकरच कालव्याचे काम पूर्ण हाेऊन शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पाेहाेचावे, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Gosekhurd project at full capacity for the first time; 245.50 m water level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.