दिघोरी-लाखांदूर रस्त्याच्या कामाने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:01:47+5:30

रस्त्यावरुन वाहने जाताना मोठ्या प्रमाणात धूळ तर काही ठिकाणी चिखल उडत आहे. त्याचा वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ते हैराण झाले आहेत. धुळीचे प्रमाण वाढले असल्याने अनेकवेळा किरकोळ अपघातही घडले आहेत. वाहनचालकांना दिवसाही लाईट सुरू ठेवून प्रवास करावा लागतो.

Citizens harassed by Dighori-Lakhandur road work | दिघोरी-लाखांदूर रस्त्याच्या कामाने नागरिक हैराण

दिघोरी-लाखांदूर रस्त्याच्या कामाने नागरिक हैराण

ठळक मुद्देचौकशीची मागणी : निकृष्ट काम होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
बारव्हा : साकोली ते वडसा या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होणार असल्याने दिघोरी, लाखांदूर, सोनी, चप्राड परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम करून मुरुमाचा भराव टाकल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल तर काही ठिकाणी धूळीचे लोट उडत असल्याने नागरिक गत काही दिवसापासून त्रस्त झाले आहेत.
रस्त्यावरुन वाहने जाताना मोठ्या प्रमाणात धूळ तर काही ठिकाणी चिखल उडत आहे. त्याचा वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ते हैराण झाले आहेत. धुळीचे प्रमाण वाढले असल्याने अनेकवेळा किरकोळ अपघातही घडले आहेत.
वाहनचालकांना दिवसाही लाईट सुरू ठेवून प्रवास करावा लागतो. सध्या रस्त्यावर भरावाचे काम सुरू असताना धूळ उडू नये, म्हणून कंत्राटदार कंपनीकडून रस्त्यावर पाणी मारणे गरजेचे असताना टाळाटाळ करत होता. याबाबत विचारणा करण्यासाठी कंत्राटदाराशी संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.
काही ठिकाणी चिखल झाल्याने दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात आवश्यक तितकी सुरक्षितता बाळगली जात नसल्याचा आरोपही परीसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

अल्पावधीतच रस्त्याला पडल्या भेगा
लाखांदूर ते दिघोरीपर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम जोमाने सुरू आहे, मात्र बांधकामात गैरप्रकार होत असल्याने बांधकाम निकृष्ट होत असल्याची ओरड परिसरातील नागरिकांमधून होत आहे. चिचाळ, बारव्हा, दिघोरी येथील नुकताच झालेल्या महामार्गावरील सिमेंट रस्त्याला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत, या मार्गावरून जड वाहतूक बंद आहे, तरीदेखील अल्पावधीतच भेगा पडल्याने रस्त्याचे काम किती दर्जेदार आहे याचा प्रत्यय येत असल्याने रस्ते कामावर बारव्हा परिसरातील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या निकृष्ट बांधकामाची निष्पक्षपणे चौकशी करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Citizens harassed by Dighori-Lakhandur road work