दीड महिन्याची मजुरी गेली आता आमची सुरु आहे उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST2020-05-06T05:00:00+5:302020-05-06T05:00:11+5:30

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख उद्योगापैकी एक म्हणजे विडी उद्योग. आधीच हा उद्योग मोडकळीस आला आहे. आता कोरोनाच्या लॉकडाऊनने संपूर्ण कामगार घरी बसले आहेत. विडी उद्योगाच कंत्राटदार, ठेकेदारांमार्फत मजुरांना तेंदूपत्ता, तंबाखू आणि सुताचा पुरवठा केला जातो. मजुरांनी तयार केलेल्या विड्या कारखान्याला पुरविल्या जातात. दोन्ही जिल्ह्यातील हजारो मजूर या कामावर आपला चरितार्थ चालवितात.

After a month and a half of wages, we are now starving | दीड महिन्याची मजुरी गेली आता आमची सुरु आहे उपासमार

दीड महिन्याची मजुरी गेली आता आमची सुरु आहे उपासमार

ठळक मुद्देबिडी कामगार महिलांची व्यथा : कोरोनाच्या लॉकडाऊनने शेकडो कामगार लागले देशोधडीला

राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : हाताची बोटे दुखेपर्यंत एक-एक विडी वळायची. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशावर संसाराचा गाढा चालायचा. ऐवढ्यातच कोरोनाचे संकट आले. मार्च महिन्यापासून विडी वळण्याचे काम बंद झाले. कंपनीकडून मिळणारा बोनस गेला, दीड महिन्याची मजुरीही गेली. आता आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, अशी आपबिती तुमसर शहरात गत अनेक वर्षापासून विडी वळण्याचे काम करणाऱ्या महिला सांगत होत्या.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख उद्योगापैकी एक म्हणजे विडी उद्योग. आधीच हा उद्योग मोडकळीस आला आहे. आता कोरोनाच्या लॉकडाऊनने संपूर्ण कामगार घरी बसले आहेत. विडी उद्योगाच कंत्राटदार, ठेकेदारांमार्फत मजुरांना तेंदूपत्ता, तंबाखू आणि सुताचा पुरवठा केला जातो. मजुरांनी तयार केलेल्या विड्या कारखान्याला पुरविल्या जातात. दोन्ही जिल्ह्यातील हजारो मजूर या कामावर आपला चरितार्थ चालवितात. गत काही वर्षापासून या उद्योगाला उतरती कळा लागली. परंतु आजही अनेक जण दुसरे काही करता येत नसल्याने विड्या वळण्याचे काम करतात.
तुमसर तालुक्यातील चिखला येथील पल्लवी धारगावे सांगत होत्या, कोरोनामुळे विडी बांधण्याचे काम मार्च महिन्यात बंद झाले. त्यामुळे बोनस मिळाला नाही. दीड महिन्याची मजुरीही गेली. आता जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तुमसर येथील भोजवंता नागदेवे म्हणाल्या, आमचे संपूर्ण कुटुंब विडी व्यवसायावर आहे. काम बंद असल्याने पैसे मिळत नाही. किराणा दुकानदार उधार देत नाही. शासनाकडून मिळालेले धान्य शिजवून किती दिवस काढायचे. सतत उपासमार सुरु आहे. दोन वेळच्या भोजनासाठी दारोदार फिरण्याची वेळ आली आहे.
तुमसर येथील विडी कामगार मनिलाल मेश्राम आपली व्यथा सांगताना म्हणाले, जिल्ह्यात दुसरे उद्योगधंदे नाहीत. भूमीहीन शेतकरी असल्यामुळे गत अनेक वर्षांपासून विडी वळण्याचे काम करीत आहोत. विडी वळण्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम करू शकत नाही. अशा परिस्थितीत काम बंद ठेवून सरकार आम्हाला उपाशी तर मारत नाही ना असे मनीलाल म्हणाले.

दिवसाला मिळतात शंभर ते दीडशे रुपये
विडी वळण्याच्या कामात असलेल्या मजुरांना एक हजार विड्यांसाठी १०० रुपयापर्यंत मजुरी दिली जाते. एक मजूर दिवसाला दीड हजार विड्या सहज वळतो. त्यामुळे १०० ते १५० रुपये रोज मजुरी मिळते. अख्खे कुटुंबच या कामात असल्याने चरितार्थ चालविण्यापुरते पैसे मिळतात. परंतु आता लॉकडाऊनने संपूर्ण व्यवहारच ठप्प झाले.

कोरोनामुळे विडी कामगारांना बोनस देण्यात आला नाही. अद्यापपर्यंत विडी खरेदी करण्यासंदर्भात कसलीही माहिती मिळाली नाही. सध्या विडीचा व्यवसाय बंद आहे. अनेकांपुढे गहन प्रश्न निर्माण झाला आहे.
-प्रमोद घरडे, विडी कंत्राटदार, तुमसर.

Web Title: After a month and a half of wages, we are now starving