मोठा अनर्थ टळला! एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालय परिसरात आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 00:47 IST2026-04-27T00:47:08+5:302026-04-27T00:47:53+5:30
भंडारा शहरात नागपूर मार्गावर एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक कार्यालय आहे. या कार्यालयामागे विस्तीर्ण असा परिसर असून तिथे जंगल उभे झाले आहे.

मोठा अनर्थ टळला! एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालय परिसरात आग
भंडारा : राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या मागील परिसरात असलेल्या विस्तीर्ण जागेत आग लागली. या परिसरालगत घरे असल्याने प्रचंड धावाधाव उडाली अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर रात्री अकरा वाजता ही आग विझविण्यात यश आले.
भंडारा शहरात नागपूर मार्गावर एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक कार्यालय आहे. या कार्यालयामागे विस्तीर्ण असा परिसर असून तिथे जंगल उभे झाले आहे. झाडाझुडपांनी वेढलेल्या या परिसरात शनिवारी (२६ एप्रिल) सायंकाळी सुमारे साडेपाच ते साडेसहा वाजताच्या व सुमारास आग लागली. मात्र हे कोणाच्याही लक्षात आले नाही. ही आग पसरत पुढे पोहोचली. रात्री ९ वाजताच्या सुमारास या परिसरालगत असलेल्या नागरिकांना आगीच्या ज्वाळा दिसल्यावर हा प्रकार लक्षात आला.
आगीचा परिसर झाडाझुडपांनी वेढलेला असल्याने तिथपर्यंत पोहोचणे कुणालाही शक्य नव्हते. नागरिकांनी अग्निशामक विभागाला आणि पोलिसांना माहिती दिली. तीन बंब या परिसराजवळ पोहोचले. मात्र घटनास्थळापर्यंत कोणालाही जाता येत नव्हते. अखेर रात्री सुमारे सव्वा दहा वाजताच्या सुमारास या परिसरातील काही युवकांनी आत जाण्याचा मार्ग शोधून काढला. त्यानंतर अग्निशामक विभागाच्या पथकाने व युवकांनी आगीच्या ठिकाणी पाण्याच्या पाईपसह पोहचून पाण्याचा मारा केला व आग विझवली. रात्री ११:०० वाजताच्या सुमारास ही आग आटोक्यात आली.
मोठा अनर्थ टळला
एस टी महामंडळाच्या या विस्तीर्ण परिसराला लागूनच उत्तरेकडे लोकांची घरे आहेत. ही आग अगदी वस्तीपर्यंत पोहोचण्याच्या बेतात आली होती. वेळीच नियंत्रण मिळवले नसते तर या परिसरातील घरेही धोक्यात येण्याची शक्यता होती.