3 kg of marijuana seized in Lakhani | लाखनीत ४० किलो गांजा जप्त
लाखनीत ४० किलो गांजा जप्त

ठळक मुद्देचौघांना अटक : गोपनीय माहितीच्या आधारे केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत दुचाकीस्वारांच्या ताब्यातून ४० किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई लाखनी पोलिसांनी मंगळवारला सकाळच्या सुमारास केली. पवन उपाध्याय (२४), बालाराम डुंभरे (२७), सोनू दुबे (२८) व किशोर उईके (१९) सर्व राहणार सानेगाव जि. देवांश (मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या इसमांची नावे आहेत.
माहितीनुसार, लाखनी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील निराळे व पोलीस नायक धनराज भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली की, छत्तीसगड येथून दोन दुचाकीच्या माध्यमातून गांजाची तस्करी करण्यात येत आहे. या माहितीच्या आधारावर पोलीस ठाणे समोरच नाकाबंदी करण्यात आली. यात दोन विना नंबरच्या दुचाकींना अडवून इसमांची विचारपूस करण्यात आली. यावेळी त्यांच्या ताब्यातून ४० किलो गांजाही जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत ४ लाख रुपये सांगण्यात येते. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी गांजा जप्त करण्याची कारवाई असल्याचे सांगण्यात येते.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मंडलवार, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील निराळे, सहाय्यक फौजदार देवानंद संतापे, हवालदार भगवान थेर, विजय हेमणे, पठाण, धनराज भालेराव, प्रकाश तांडेकर, उमेश शिवणकर, निशांत माटे, हरिश्चंद्र देवदाते, सुभाष हटवार आदींनी केली.

Web Title: 3 kg of marijuana seized in Lakhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.