अविरोध निवडणूक करणाऱ्या गावांना २५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:00 AM2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:01:10+5:30

मोहाडी तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपाठोपाठ १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जुलै महिन्यात होणार आहेत. त्यात ताडगाव, सालई खुर्द, भिकारखेडा, पिंपळगाव, रोहा, पारडी, कान्हळगाव (सिर), मांडेसर, दहेगाव, पिंपळगाव (कान्ह.), पाचगाव, पाहुणी, देव्हाडी (बुज.), पांजराबोरी, जांभोरा, केसलवाडा, खडकी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

25 lakhs to the non-voting villages | अविरोध निवडणूक करणाऱ्या गावांना २५ लाख

अविरोध निवडणूक करणाऱ्या गावांना २५ लाख

Next
ठळक मुद्देअभिनव योजना : आमदार विकास निधीतून राजू कारेमोरे देणार निधी

राजू बांते।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : निवडणूक म्हटली की गट-तट आलेच. एकमेकांवर कुरघोडी केली जाते. निवडणुकीच्या काळात गावात सरळ दोन गट निर्माण होतात. त्यातून वादाचे प्रसंगही येतात. अनेक गावात यातून वैमनस्य वाढीला येते. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी आणि गावागावांत एकोपा नांदण्यासाठी आमदार राजू कारेमोरे यांनी पुढाकार घेतला आहे. ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध होईल त्या गावाला आपल्या विकासनिधीतून प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
मोहाडी तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपाठोपाठ १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जुलै महिन्यात होणार आहेत. त्यात ताडगाव, सालई खुर्द, भिकारखेडा, पिंपळगाव, रोहा, पारडी, कान्हळगाव (सिर), मांडेसर, दहेगाव, पिंपळगाव (कान्ह.), पाचगाव, पाहुणी, देव्हाडी (बुज.), पांजराबोरी, जांभोरा, केसलवाडा, खडकी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. आरक्षण सोडत झाल्यापासून निवडणुकीचा ज्वर चढला आहे. लवकरच या गावात प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. गावखेड्यातील राजकारण म्हणजे टोकाचे असते. गावाच्या विकासासाठी कमी आणि प्रतिष्ठेसाठीच अधिक निवडणूका लढल्या जातात. यामुळे गावात वाद होऊन विकास खोळंबतो.
हा प्रकार टाळण्यासाठी आणि गावाचा विकास व्हावा यासाठी आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी - तुमसर तालुक्यात अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करणाºया गावांना आमदार विकास निधीतून सात ते २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार कारेमोरे यांनी केली आहे. नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीला ११ लाख, ११ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीला १५ लाख, १५ आणि १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये प्राधान्याने विकास निधी दिला जाणार आहे. तसेच गावातील एखादा प्रभाग अविरोध झाल्यास त्याला तीन लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
यामुळे गावात अविरोध निवडणुकीसाठी नागरिकांना प्रेरणा मिळणार आहे. गावातील गट-तट संपुष्टात येऊन गावात ऐक्याचे वातावरण निर्माण होईल.

जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच उपक्रम
भंडारा जिल्ह्याच्या इतिहासात असा नाविण्य उपक्रम आमदार राजू कारेमोरे राबवित आहेत. गावाच्या विकासाला चालना देणारा हा उपक्रम असून यामुळे गावात एकतेची शक्ती वाढणार आहे. सामंजस्यातून ग्रामपंचायत सदस्य अविरोध निवडून येतील. त्यामुळे कोणतेही गट-तट गावात राहणार नाहीत. गावाची ओळख आदर्श गाव म्हणून होण्यास वेळ लागणार नाही.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संकल्पनेतून आदर्श गाव निर्मितीची चळवळ सुरु व्हावी, असा माझा प्रयत्न आहे. विकासनिधी मतदार संघातील गावांना दिला जातो. परंतु अविरोध निवडणूक होणाºया गावांना प्राधान्याने विकास निधी दिला जाईल. एकता व आदर्श निर्माण व्हावी हे माझे स्वप्न असून ते साकार करण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्व तालुक्यातील जनता याला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे.
-राजू कारेमोरे, आमदार तुमसर.

Web Title: 25 lakhs to the non-voting villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.