संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:22 IST2025-10-09T12:20:53+5:302025-10-09T12:22:08+5:30
Sankashti Chaturthii : यंदा १० ऑक्टोबर रोजी चातुर्मासातली शेवटची संकष्टी आहे, त्यानिमित्त ओळख करून घेऊया महराष्ट्रात वसलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गणेश मंदिराचं!

संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
१० ऑक्टोबर रोजी चातुर्मासातली शेवटची संकष्ट चतुर्थी(Sankashthi Chaturthi 2025) आहे. त्यानिमित्त बाप्पाचे मंगलमूर्ति आणि १८ हातांनी १८ आयुधे धारण केलेले वैशिष्ट्यपूर्ण मंदिर कोठे आहे, कसे आहे आणि त्यामागील आख्यायिका काय आहे, हे सविस्तर जाणून घेऊ.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्ट नुसार, 'रत्नागिरीतील प्रसिध्द धार्मिक स्थळांपैकी एक असलेले स्थळ म्हणजे वरची आळी येथील "अठरा हाताचा गणपती"! रत्नागिरीतील या मंदिराची ख्याती सर्वदूर आहे. हे मंदिर जोशी कुटुंबीयांचे खासगी मालकीचे आहे. मात्र असे असले तरी मंदिर दर्शनासाठी सर्वाना खुले आहे. दर संकष्टीला, अंगारकी संकष्टीला, तसेच दर मंगळवारी गणेशभक्त बहुसंख्येने या गणेशाच्या दर्शनाला येत असतात. या मंदिरातील गणपतीच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीला अठरा हात आहेत. यावरून "अठरा हाताचा गणपती" तथा 'अष्टदशभुजा' असा या मंदिराचा नामोल्लेख केला जातो. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे संपूर्ण भारतात अठरा हात असलेली श्री गणेशाची ही एकमेव मूर्ती आहे. तसेच हे एकमेव मंदिर आहे. रुद्रयामल पुराणातील मंत्र दैवत म्हणून हा गणेश ओळखला जातो, अशी माहिती धर्मदास, कीर्तनकार नाना जोशी यांनी दिली.
विनायकराव कृष्ण जोशी यांनी १९६७ साली या मंदिराची स्थापना केली. आजच्या घडीला या मंदिराला ५८ वर्षे पूर्ण होत आहेत. याबाबत आख्यायिका अशी सांगितली जाते की, विनायकराव जोशी हे राजापूरच्या पोस्ट कार्यालयात पोस्टमास्तर म्हणून सेवेत असताना इंदूर येथील अच्युतानंद तीर्थस्वामी आपणाहून घरी आले आणि या गणपतीची उपासना करायला सांगितली. काही वर्षांनी विनायकराव जोशी यांची नोकरी सुटल्याने ते महाराजांना भेटायला गेले. तेव्हा ते म्हणाले की, आता या गणपतीची पूर्ण उपासना कर, संपूर्ण भारतभर तुझी कीर्ती होईल. अच्युतानंद तीर्थस्वामींचे भारतभर १५०० हून अधिक शिष्य होते, त्यापैकी विनायकरावांनाच त्यांनी गणेश उपासना करायला सांगितली आणि इतरांना देवीची उपासना दिली. त्यानंतर विनायकरावानी गणपतीपुळे येथे जाऊन २१ दिवसांची कठोर उपासना केली. तेव्हा देवाने त्यांना साक्षात द्रष्टांत देऊन मंदिर बांधण्याचा आदेश दिला. त्यानंतर विनायकरावांनी हे मंदिर बांधले असे सांगितले जाते. मंदिर खासगी असल्याने मंदिरासाठी कोणतीही देणगी स्वीकारली जात नाही.
मंदिर अत्यंत साधे कोंकणी स्वरूपाचे आहे. गाभारा छोटेखानी आहे त्यामध्ये अठरा हाताच्या गणपतीची पुर्वाभूमुखी प्रसन्न मूर्ती आहे. या मंदिराच्या स्थानची प्रसन्नता भक्तांना ऊर्जा देऊन जाते. या मूर्तीचे वेगळेपण म्हणजे या श्री गणेशाला १८ हात आहेत. त्याच्या प्रत्येक हातात १८ प्रकारची आयुधे आहेत. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असा देवाचा वार्षिक उत्सव असतो. त्यावेळेला या मंदिरात सर्व धर्मिक विधी केले जातात. मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थीला दुपारी १२.३९ वाजता जन्मोत्सव साजरा केला जातो. यावेळी देवाला सहस्त्र मोदक, सहस्त्र दुर्वा, सहस्त्र शमीपत्रे, सहस्त्र तीळ, सहस्त्र तांदूळ वाहिले जातात. पंचमीच्या दिवशी तो मोदक प्रसाद म्हणून गणेशभक्तांना वाटण्यात येतो. हा गणेश आपल्या मनोकामना पूर्ण करतो अशी गणेशभक्तांची श्रद्धा आहे. या मंदिरात दर मंगळवारी, संकष्टी चतुर्थी, अंगारकी संकष्टीला अठरा हाताच्या गणपतीचे भाविक बहुसंख्येने दर्शन घेतात.
अठरा हाताच्या गणपतीचे दर्शन कोल्हापूर पीठाचे शंकराचार्य, सिद्धयोगी, प्रख्यात कीर्तनकार, प्रवचनकार आदींनी घेतले आहे. या मंदिराची सर्व व्यवस्था नाना जोशी आणि त्यांचे बंधू, कुटुंबीय पाहतात.