रक्षाबंधन: भद्रकालात राखी बांधावी की नाही? जाणून घ्या, शास्त्र नेमके काय सांगते

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 11:29 AM2023-08-29T11:29:42+5:302023-08-29T11:31:52+5:30

Raksha Bandhan 2023: भद्रा काळ म्हणजे नेमके काय? रक्षाबंदनाच्या दिवशी भद्रकालात राखी बांधणे अशुभ मानले जाते का? जाणून घ्या...

raksha bandhan 2023 is it tie rakhi auspicious in bhadra kaal know about what is in shastra | रक्षाबंधन: भद्रकालात राखी बांधावी की नाही? जाणून घ्या, शास्त्र नेमके काय सांगते

रक्षाबंधन: भद्रकालात राखी बांधावी की नाही? जाणून घ्या, शास्त्र नेमके काय सांगते

googlenewsNext

Raksha Bandhan 2023: चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे. ३० ऑगस्ट रोजी श्रावणी पौर्णिमा आहे. या दिवशी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात देशभरात साजरा केला जातो. मात्र, यंदाच्या रक्षाबंधनाला भद्र काळ येत आहे. भद्र काळ हा शुभ गोष्टी करण्यासाठी योग्य मानला जात नाही. त्यामुळे भद्रकालात राखी बांधावी का? भद्र काळ असताना रक्षाबंधन करणे अशुभ असते का? नेमके रक्षाबंधन कधी करावे? शास्त्रात नेमके काय सांगितले आहे? जाणून घेऊया...

रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन. या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचे मानले जाते. विधिवत, शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते. शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते, अशी मान्यता आहे. भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो, असे सांगितले जाते. 

भद्र काळ म्हणजे नेमके काय?

पंचागाची वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण अशी पाच अंगे आहेत. सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी इत्यादीचा बोध पंचागातून होतो. याच पाच अंगांशी 'करण' आणि 'भद्रा काळ' याचा संबंध आहे. ज्या दिवशी 'विष्टी' करण असते, त्या दिवशी भद्रा काळ असतो. याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे. ३० ऑगस्टच्या रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्र 'विष्टी' करण आणि 'कुंभ' राशीत असणार आहे. याच अनुषंगाने या दिवशी भद्राकाल वर्तविला जात आहे. मुहूर्त चिंतामणी, मुहूर्त मार्तंड ग्रंथात याची सखोल माहिती मिळते. भद्राकाळ अशुभ मानला जातो. महत्त्वाची शुभ कार्ये भद्राकालात करू नयेत, असे म्हटले जाते. 

भद्रकालात राखी बांधावी का?

देशभरात अनेक ठिकाणी विधीपूर्वक रक्षाबंधन केले जाते. शास्त्रशुद्ध पद्धतीने राखी बांधली जाते. शास्त्रानुसार, जर मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल, तर भद्रा करण असताना केला जात नाही. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून ०२ मिनिटांपर्यंत भद्रा करण आहे. परंत, महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. त्यामुळे ३० ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधली तरी चालेल. भद्राकालात राखी बांधली तर वाईट होईल, असे जे म्हटले जाते, त्यात काहीही तथ्य नाही, असे तज्ज्ञ सांगतात. 

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कधी?

यंदा रक्षाबंधन सण कधी साजरा करायचा ? बुधवार, ३० ऑगस्ट की गुरुवार, ३१ ऑगस्टला? रक्षाबंधन बुधवार ३० ऑगस्ट रोजी साजरी करावी, असे सांगितले जाते. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे आणि गुरुवार ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून ०५ मिनिटांनी श्रावण पौर्णिमा समाप्त होत आहे. शास्त्रनियमाप्रमाणे बुधवारी ३० ऑगस्ट रोजीच रक्षाबंधन सण साजरा करायचा आहे. शास्त्रनियम असा आहे की, सूर्योदयापासून ६ घटिकांपेक्षा जास्त व्यापिनी अशा श्रावण पौर्णिमेच्या  दिवशी अपरान्हकाली किंवा प्रदोषकाली रक्षाबंधन करावयाचे आहे. तशी स्थिती बुधवारी ३० ऑगस्ट रोजी आहे . म्हणून सर्वांनी बुधवार ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा करावा, असे सांगितले जाते.

 

Web Title: raksha bandhan 2023 is it tie rakhi auspicious in bhadra kaal know about what is in shastra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.