मेडिटेशन हा शब्द अलीकडे परवलीचा झाला आहे. पण हा शब्द रूढ होण्याच्या हजारो वर्ष आधीपासून ऋषीमुनी ध्यानधारणा करायचे. कारण ध्यानधारणेचे अगणित लाभ आहेत. मात्र ते लाभ मिळवण्यासाठी ध्यान कसे लावायला हवे हे ध्यान देऊन अर्थात लक्ष देऊन वाचा.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्वेसर्वा आणि अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेले श्री. श्री. रविशंकर सांगतात, मेडिटेशन अर्थात ध्यान करणे कठीण नाही, मात्र अनेक लोक त्याचा अकारण बाऊ करतात. ध्यान करण्यासाठी शांत बसलो आहे असे दाखवतात मात्र मनात असंख्य विचार सुरु असतात. हे विचार थांबेपर्यंत ध्यान होणार नाही, मग तुम्ही दिवसभर का बसून राहीनात! त्यासाठी मुख्य तीन नियम जाणून घ्या.
ध्यान करण्यापूर्वी तीन गोष्टी ध्यानात ठेवा (Meditation Tips)-
मी कोणी नाही -
आपण आपले अस्तित्त्व विसरून जोवर स्वतःला परमात्म्याच्या स्वाधीन करत नाही तोवर आपले विचार चक्र थांबणार नाही. आपण गरीब आहोत की श्रीमंत, सुखात आहोत की दुःखात, तरुण आहोत की वृद्ध या आपल्या अस्तित्त्वाच्या खुणा विसरल्याशिवाय आपण ध्यान लावू शकणार नाही. गरीब असलो तर श्रीमंत कसे होऊ याचे विचार येणार, श्रीमंत असू तर आणखी श्रीमंत कसे होऊ याचे विचार येणार. विचारांची प्रक्रिया थांबवायची असेल तर स्वतःला विसरून जा आणि ध्यान धारणेला बसा.
मी काही करणार नाही -
आयुष्यात येणाऱ्या घटनांना सामोरे जाताना तटस्थ राहून पाहता यायला हवं. त्यासाठी काही क्षण थांबायला हवं. जे होत आहे, त्यात मी काहीच भूमिका घेणार नाही, नुसतं बघत राहीन असं म्हणत विचारांनी थांबायला हवं. हा पॉज देता येतो, मनावर निग्रह मिळवता येतो, हे सवयीने साध्य होतं. यासाठीच ध्यान लावताना मन शांत ठेवून श्वास कसा घेतो आणि कसा सोडतो या क्रियेवर लक्ष केंद्रित करा असं सांगितलं जातं. मन जेव्हा एका विचारात स्वतःला गुंतवून घेतं, तेव्हाच इतर गोष्टीतून अलिप्त होतं.
मला मला काही नको -
सतत काहीतरी मिळवण्याची लालसा मन:शांती मिळू देत नाही. ध्यान लागायला हवं, हेही एक मागणंच आहे. परमेश्वर कृपा व्हावी, हेही मागणंच आहे. आपल्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी मागितलेला आशीर्वाददेखील मागणंच आहे. अशा वेळी मला काही नको हा पवित्रा घ्यायला शिका. मनावर ताबा हवा, तरच जिभेवर, शब्दावर, खर्चावर आपोआप ताबा ठेवता येईल आणि ध्यान धारणेत लक्ष केंद्रित करता येईल.