भगवंताचे अस्तित्व कसे ओळखावे? -ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 07:30 IST2020-11-25T07:30:00+5:302020-11-25T07:30:02+5:30
जीवनाचे कोडे सोडवण्यासाठी अज्ञात असा भगवंत गृहित धरलाच पाहिजे. त्या भगवंताचे खरे स्वरूप, जीवनाचे कोडे सुटेल त्यावेळी आपल्याला कळेल.

भगवंताचे अस्तित्व कसे ओळखावे? -ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
भगवंत निश्चित आहे, हे काहींना अनुभवाने कळले आहे. मात्र, इतरांनी ते अस्तित्व कसे ओळखावे, याबाबत गोंदवलेकर महाराज मार्गदर्शन करतात-
बीजगणितामध्ये उदाहरण सोडवताना एक अज्ञात क्ष घ्यावा लागतो. उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत क्ष ची खरी किंमत काय, हे आपल्याला कळत नाही, पण तो घेतल्याशिवाय चालत नाही. त्याप्रमाणे जीवनाचे कोडे सोडवण्यासाठी अज्ञात असा भगवंत गृहित धरलाच पाहिजे. त्या भगवंताचे खरे स्वरूप, जीवनाचे कोडे सुटेल त्यावेळी आपल्याला कळेल.
हेही वाचा : हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी!- आशोंची बोधकथा!
जन्ममरणापासून मुक्त होण्याचा मार्ग जो आपल्याला दाखवतो, तो खरा आप्त. भगवंताला सर्वात प्रिय काय आवडते, हे संतांनी सांगून टाकले आहे. ते म्हणजे, 'आपण विषय, वासना इ. गोष्टी सोडून भगवंताला शरण जावे.' आपण नेहमी विषयांना शरण जातो. जो भगवंताला शरण गेला, त्याला जगाची भीती उतर नाही.
आपण जिना चढतो, ते वरच्या मजल्यावर जाण्यासाठी. जिना हे केवळ माध्यम आहे. त्याप्रमाणे तीर्थयात्रा, व्रते, नामस्मरण ही साधने असून परमेश्वरप्राप्ती हे आपले साध्य आहे. मात्र, परमेश्वरप्राप्ती बाजूला राहते आणि आपण साध्य सोडून साधनांना घट्ट धरून बसतो.
भगवंताने केलेल्या सृष्टीत आपल्याला बदल करायचा नसून, बदल स्वत:मध्ये करायचा आहे. आपले सगळे जीवन भगवंताच्या हातामध्ये आहे, तर मग जीवनातल्या सगळ्या घडामोडी त्याच्याच हातात नाही का? झाडाच्या मुळांना पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना पोहोचते, तसे भगवंताचा विसर पडू न दिला, तर सर्वकाही व्यवस्थित होते.
भगवंत हवाहवासा वाटणे, यामध्ये सर्व मर्म आहे. आत्मा समुद्रासारखा आहे, त्याचा अगदी लहान थेंब, त्याप्रमाणे हा जीव आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे, हेच खरे तत्वज्ञान आहे. या आत्म्याचे नित्य स्मरण ठेवून आनंदात राहावे.
दैनंदिन उदाहरणातून गोंदवलेकर महाराजांनी भगवंताकडे पाहण्याची आणि त्याला शोधण्याची दृष्टी आपल्याला दिली आहे. गुरुकृपेशिवाय भगवंताची ओळख पटणे शक्य नाही. गोंदवलेकर महाराजांनी आपल्या आयुष्याचे कोडेच उलगडून दाखवले आहे. आपणही क्ष चा आधार घेत, आयुष्याचे समीकरण सोडवुया.
हेही वाचा : प्रत्येक काम भगवंताचे समजून करा; पांडुरंगशास्त्री आठवलेंचा 'स्वाध्याय'