आयुष्याचं नियोजन करत बसू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 07:54 AM2020-03-03T07:54:55+5:302020-03-03T08:43:18+5:30

तुमचे आयुष्य जर तुम्ही आखलेल्या योजनेप्रमाणेच जात असेल तर त्याचा अर्थ तुम्ही अगदीच क्षुद्र आयुष्य जगत आहात. तुमचे आयुष्य तुम्ही कल्पनादेखील केली नसेल अश्या प्रकारे घडायला हवे.

Dont plan your life | आयुष्याचं नियोजन करत बसू नका

आयुष्याचं नियोजन करत बसू नका

googlenewsNext

प्रश्नकर्ता : मी माझे आयुष्य आखतो आहे आणि बरेचदा नियोजनामध्ये हरवून जात आहे. तरीसुद्धा अजूनही गोष्टी मला हव्या तश्या घडत नाही आहेत. मी काय करू?

सद्गुरू : योजना तुमच्या मनात असतात. पण ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्याच तुम्ही करू शकता. नियोजनाला किती वेळ द्यायचा आणि प्रत्यक्ष काम करायला किती वेळ द्यायचा हे प्रत्येकाने स्वतःचे आयुष्य बघून ठरवायला हवे. तुम्ही जर नियोजन समितीवर असला तर तुम्ही फक्त नियोजन कराल - तेच तुमचे काम आहे. त्याची अंमलबजावणी करणे हे दुसऱ्याचे काम आहे. तुमच्या कामाचे स्वरूप काहीहि असले तरी जीवनाचे स्वरूप असेच असते कि तुम्ही फक्त आत्ताच खावू शकता, तुम्ही फक्त आत्ताच श्वास घेवू शकता, तुम्ही फक्त आत्ताच जगू शकता. नियोजन सुद्धा तुम्ही फक्त आत्ताच करू शकता. तुम्ही उद्याबद्दल चे नियोजन करू शकता. पण तुम्ही उद्या नियोजन करू शकत नाही.

आयुष्य एखाद्या योजनेप्रमाणे घडावं का?

एखादी योजना हा फक्त एक विचार आहे, आणि आपल्या सगळ्या योजना आपल्याला जे आधीपासून माहीत आहे त्यावर आधारित असतात. आपली योजना ही आपल्या भूतकाळाचीच सुधारित आवृत्ती असते. एखादी योजना म्हणजे भूतकाळाचा एखादा तुकडा घ्यायचा आणि त्याला थोडा मेकअप करायचा. ही जगण्याची खूपच क्षुद्र पद्धत झाली. आपल्याला एखाद्या योजनेची निश्चितच गरज असते, पण तुमचे आयुष्य जर तुम्ही आखलेल्या योजनेप्रमाणेच जात असेल तर त्याचा अर्थ तुम्ही अगदीच क्षुद्र आयुष्य जगत आहात. तुमचे आयुष्य तुम्ही कल्पनादेखील केली नसेल अश्या प्रकारे घडायला हवे.



आयुष्यातील शक्यतांची व्याप्ती इतकी मोठी असते की कोणीही त्या प्रमाणे योजना आखू शकत नाही. एक पर्यायी व्यवस्था म्हणून नियोजन करायला हरकत नाही पण आयुष्य आपले आपण घडू द्या. आयुष्यातील शक्यतांचा शोध घ्या. तुमच्या समोर काय येईल, काही सांगता येणार नाही.आत्तापर्यंत इतर कोणाच्याहि बाबतीत न झालेली गोष्ट तुमच्या बाबतीत घडू शकते. पण जर तुमचे आयुष्य तुमच्या योजनेप्रमाणे जात असेल तर आत्तापर्यंत जगात जो मूर्खपणा होत आला आहे, तोच तुमच्याही बाबतीत घडेल. नवीन असं काहीच घडणार नाही कारण तुमची योजना तुम्हाला आधी माहित असलेल्या गोष्टी, ज्ञान आणि अनुभवावर आधारित असते.

नियोजन किती प्रमाणावर करावे याचे तुम्ही भान राखले पाहिजे. तुमच्याकडे कोणतीच योजना नसेल तर तुम्हाला उद्या काय करावे ते कदाचित कळणारही नाही. आयुष्यात ठराविक समतोल साधत आणि आयुष्याबद्दलची समज लक्षात घेऊन काय नियोजन करायचे आणि काय सोडून द्यायचे हे ठरवले पाहिजे. बहुतांशी लोकांच्या योजना कुठल्याही दिव्यदृष्टीतून आलेल्या नसतात. अनपेक्षित गोष्टीना घाबरून तोंड देता न येण्याच्या भीतीतून त्या प्रामुख्याने जन्माला आलेल्या असतात. माणसाला त्यांचे आयुष्य त्यांच्या म्हणण्या प्रमाणे घडत नाही हेच एकमेव दुःख असते. तुम्हाला सकाळी कॉफी हवी असते आणि तुम्हाला कॉफी मिळत नाही, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ असता. परंतु उत्कृष्ट सूर्योदय होत असतो आणि तुम्ही तो बघत नाही. तुमची एखादी क्षुल्लक योजना प्रत्यक्षात येत नाही पण त्याहून कितीतरी उच्च कोटीचे काहीतरी घडत असते.

या विश्वाच्या पसाऱ्यात आणि तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या जीवनाच्या आविष्कारात तुमच्या योजना क्षुल्लक आहेत. तुमच्या योजनांना इतके महत्व देवू नका.उद्या सकाळी काय करायचे याची एखादी योजना करण्याची गरज निश्चितच आहे, पण तुमचे आयुष्य तुमच्या योजनेप्रमाणे जावे अशी अपेक्षा कधीच ठेवू नका. आणि त्याहून महत्वाचे म्हणजे तुमचे आयुष्य तुमच्या योजनांच्या, कल्पनाशक्तीच्या आणि तुमच्या सर्व अपेक्षांच्या पलीकडचे घडावे असे स्वप्न नेहमी बघा.

Web Title: Dont plan your life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.