Beed Crime: भावाच्या मृत्यूचा बदला, आरोपीला त्याच झाडाखाली नेऊन संपवलं; बीडमध्ये आणखी एका हत्येनं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 10:36 IST2025-03-31T10:35:11+5:302025-03-31T10:36:44+5:30
Swapnil Deshmukh Murder Case: बंधू अविनाश देशमुख यांनी ज्या कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्याच झाडाखाली संतोष यांनी स्वप्नील देशमुखला संपवलं.

Beed Crime: भावाच्या मृत्यूचा बदला, आरोपीला त्याच झाडाखाली नेऊन संपवलं; बीडमध्ये आणखी एका हत्येनं खळबळ
Beed Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि इतर गुन्हेगारी घटनांमुळे मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. जिल्ह्यातील धारूर तालुक्यात एका तरुणाने आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेत संशयित आरोपीचा दगडाने ठेचून खून केल्याचे समोर आले आहे. स्वप्नील देशमुख असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून संतोष देशमुख असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, धारुर तालुक्यातील कान्हापूर गावातील संतोष देशमुख यांचे बंधू अविनाश देशमुख यांनी दोन वर्षांपूर्वी गावातील कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अविनाश यांनी गावातीलच स्वप्नील उर्फ बबलू देशमुख याच्या छळाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप होता. याप्रकरणी संतोष देशमुखांकडून पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती. ही केस मागे घ्यावी, यासाठी स्वप्नील देशमुख हा संतोष देशमुख यांच्यावर दबाव टाकत होता.
बीड हादरले! गेवराई तालुक्यातील मशिदीत स्फोट; आरोपींना अटक, गावात तणावपूर्ण शांतता.
आधी भावाच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेला स्वप्नील देशमुख हा आता आपल्यावरही दबाव टाकत असल्याचा राग संतोष देशमुख यांना अनावर झाला. या दोघांमध्ये रविवारी रात्री वाद झाला आणि या वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. यावेळी संतोष देशमुख आणि त्यांच्या पत्नीने मिळून स्वप्नीलच्या डोक्यावर दगडाने प्रहार करत ठेचून त्याची हत्या केली. विशेष म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू अविनाश देशमुख यांनी ज्या कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्याच झाडाखाली संतोष यांनी स्वप्नील देशमुखला संपवलं.
दरम्यान, यावेळी स्वप्नील देशमुख यानेही संतोष देशमुख आणि त्यांच्या पत्नीवर धारदार शस्त्राने पाठीत वार केले होते. स्वप्नीलच्या हत्येनंतर संतोष देशमुख आणि त्यांची पत्नी जखमी अवस्थेत पोलिस ठाण्यात हजर झाली. या दोघांनी मृत स्वप्नील देशमुखविरोधात तक्रारही दिली आहे. याप्रकरणी सध्या पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.