Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 16:35 IST2025-07-20T16:33:27+5:302025-07-20T16:35:24+5:30
Mahadev Munde Crime news: परळीतील व्यावसायिक महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे. पण, या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.

Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
Beed Crime news: २० महिने उलटूनही महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपी निष्पन्न झालेले नाहीत. याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सभागृहात दिली. तपास करताना एका महिलेने दोन व्यक्ती भांडत होत्या, अशी माहिती दिली असून, त्यानुषंगाने तपास सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले; पण महादेव मुंडे यांच्याशी वाद घालणारी दुसरा व्यक्ती कोण? याबाबत चर्चेला उधाण आले असून, पोलिसांसमोर ती व्यक्ती शोधण्याचे आव्हान कायम आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२१ ऑक्टोबर २०२३ रोजी महादेव मुंडे यांचा खून झाला होता; परंतु अद्यापही आरोपी निष्पन्न नाहीत. महादेव यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे मारेकरी शोधण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाल्या आहेत.
ज्ञानेश्वर मुंडेंनी घेतलं होतं विष
१७ जुलै रोजी त्यांनी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेऊन आल्यावर विषारी द्रव प्राशन केले होते. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतरही त्यांनी आपण महिनाभर वाट पाहून पुन्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातच आत्मदहन करणार, असा इशारा दिला आहे.
महादेव मुंडे हत्या प्रकरणात पोलिसांनी काय केलं?
आतापर्यंत तपासात १९६ जणांची चौकशी करण्यात आली. ८३ साक्षीदारांची तपासणी पोलिसांकडून करण्यात आली. त्याचबरोबर २८६ लोकांची मोबाइल क्रमांकांसंदर्भात चौकशी केली गेली आहे. १५० मोबाइल क्रमांकांचा डेटा पोलिसांनी मिळवला असून, ३७ जणांचे जबाब नोंदवले आहेत.
८ महिने उलटले, पण हत्येचा उलगडा नाही
२१ ऑक्टोबर २०२३ ते १९ जुलै २०२५ हा १ वर्ष, ८ महिने आणि २९ दिवसांचा कालावधी उलटूनही पोलिसांना मुंडे खून प्रकरणाचा उलगडा करता आलेला नाही. आतापर्यंत सात तपास अधिकारी बदलले. यात आयपीएस कमलेश मीना यांचाही समावेश होता; परंतु त्यांनाही अपयश आले. आता हा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.
बांगरने पोलिसांना काय सांगितले?
बाळा बांगरने या प्रकरणात वाल्मीक कराड, त्याचा मुलगा व गोट्या गित्ते असल्याचा आरोप केला, त्यांनी मांसाचा तुकडा आपल्यासमोर कराडच्या टेबलवर ठेवल्याचा दावा केला होता. पोलिसांनी बांगर यांचा जबाब घेतला; परंतु पुढे काय चौकशी झाली, हे पोलिसांनी सांगितलेले नाही.