शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 13:19 IST2021-10-07T13:17:14+5:302021-10-07T13:19:27+5:30
Farmer dies by lightning : आष्टी तालुक्यातील कणसेवाडी येथील घटना

शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू
कडा ( बीड ) : अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु असताना शेतात काम करणाऱ्या एका तरूण शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळ्याने ( Farmer dies by lightning ) मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. बबन दशरथ कणसे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
पाऊस रोजच हजेरी लावत असल्याने शेतातील पिके संकटात सापडली आहेत. यामुळे शेतात आहे त्या परिस्थितीमध्ये काम करून शेतकरी काही उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. आष्टी तालुक्यातील बीडसांगवी गावाला लागुनच असलेल्या कणसेवाडी येथील तरूण शेतकरी बबन कणसे बुधवारी दुपारपासून शेतात काम करत होता. दरम्यान, सायंकाळी सहाच्या सुमारास काम करत असताना अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यातच बबन कणसे यांच्या अंगावर वीज कोसळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन मुले असा परिवार आहे.