३ कोटी ९२ लाख खर्च करूनही 'गळका' कारभार! आष्टी पंचायत समितीला तीन वर्षांतच गळती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 13:24 IST2025-09-30T13:19:20+5:302025-09-30T13:24:04+5:30
इमारतीच्या छतावरून सतत पाणी टिपकत असल्याने कार्यालयीन कागदपत्रे भिजून नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

३ कोटी ९२ लाख खर्च करूनही 'गळका' कारभार! आष्टी पंचायत समितीला तीन वर्षांतच गळती
- नितीन कांबळे
कडा ( बीड) : आष्टी पंचायत समितीच्या इमारतीवर अवघ्या तीन वर्षांपूर्वी यशोदिप कॉन्ट्रक्शनने तब्बल ३ कोटी ९२ लाख रुपये खर्चून नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आली होते. मात्र, पावसाळा सुरू होताच इमारतीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
इमारतीच्या छतावरून सतत पाणी टिपकत असल्याने कार्यालयीन कागदपत्रे भिजून नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांना कामानिमित्त कार्यालयात थांबणे कठीण झाले असून कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, "सार्वजनिक निधी खर्च करून सुद्धा दर्जेदार काम होत नाही. फक्त नावाला काम होऊन प्रत्यक्षात गळती थांबत नसेल तर हा निधी पाण्यातच जातो.त्यामुळे जबाबदार गुत्तेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.
गुत्तेदाराला काळ्या यादीत टाका
दर्जेदार काम होत नसल्यास सार्वजनिक निधी थेट पाण्यात गेल्यामुळे अशा निष्कृट काम करणाऱ्या गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकावे व जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
दुरूस्तीसाठी पत्र दिले
याबाबत आष्टी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने यांना विचारले असता ते म्हणाले की, इमारत गळत आहे. संबंधित गुत्तेदाराला याप्रकरणी दुरूस्तीसाठी पत्र देण्यात येईल असे त्यांनी लोकमतला सांगितले.