बोअरवेलचे वायर तुटले, जोडताना विद्युत धक्का बसल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 13:53 IST2023-12-01T13:53:12+5:302023-12-01T13:53:33+5:30
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील घटना

बोअरवेलचे वायर तुटले, जोडताना विद्युत धक्का बसल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
-नितीन कांबळे
कडा- शेतातील बोअर वेलचे तुटलेले वायर जोडताना विद्युत धक्का बसल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी सुलेमान देवळा येथे घडली. कचरू रखमाजी इथापे (४५ ) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील शेतकरी कचरू रखमाजी इथापे हे गुरूवारी दुपारी शेतात काम करत होते. दुपारच्या दरम्यान बोअरवेलचे वायर तुटलेले आढळून आले. त्यामुळे पकडच्या सहाय्याने वायर जोडण्याचा प्रयत्न इथापे यांनी केला. यावेळी अचानक विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने इथापे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात रात्री अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.
शासनस्तरावरून मदत मिळावी
कचरू इथापे याची परिस्थिती अंत्यत हलाखीची असून घरातील कर्तापुरूष गेल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.शासनस्तरावरून इथापे याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सुलेमान देवळा येथील सामाजिक कार्यकर्ते शरद घोडके यांनी केली आहे.