Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 11:17 IST2025-09-17T11:14:45+5:302025-09-17T11:17:38+5:30
Ajit Pawar News: बीड जिल्हा दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांच्या ताफ्यासमोर दोन तरुणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची दमछाक झाली.

Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
Ajit Pawar Beed News: बीड दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांचा ताफा ज्या रस्त्यावरून जात होता, तिथे अचानक दोन तरुण आले. त्यांनी बॉटलमधून अंगावर पेट्रोल ओतले. हे बघताच पोलिसांनी धाव घेत त्यांना पकडले. यावेळी गोंधळ उडाला होता. बुधवारी सकाळी शहरात ही घटना घडली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार ध्वजारोहण करण्यासाठी बीडमध्ये आले. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी ते पोलीस ग्राऊंडकडे निघाले होते. नगर नाका परिसरात ताफा येताच दोन तरुण रस्त्यावर आले आणि त्यांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
अंगावर पेट्रोल ओतले, पोलिसांची दमछाक
दोन्ही तरुणांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वतः पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण, वेळीच पोलीस कर्मचारी त्यांच्या दिशेने धावले. तरुण अजित पवारांच्या गाडीच्या दिशेने पळायला लागले. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना पकडले.
पालकमंत्री अजित पवार शहरात येणार असल्यामुळे आधीपासूनच सुरक्षेबद्दलची खबरदारी घेण्यात आली होती. पण, अचानक दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांची त्यांना पकडताना दमछाक झाली.
आत्मदहनाचा प्रयत्न का केला?
पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही तरुण केज तालुक्यातील असल्याची माहिती आहे. त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.
यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते, पण त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला होता, अशी माहिती मिळाली आहे.