Beed: 'दहा मिनिटात आलो!' शेवटचे शब्द ठरले, घराजवळच कंटेनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 12:50 IST2025-11-25T12:49:44+5:302025-11-25T12:50:43+5:30
कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वराचा मृत्यू;आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील घटना

Beed: 'दहा मिनिटात आलो!' शेवटचे शब्द ठरले, घराजवळच कंटेनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
- नितीन कांबळे
कडा ( बीड) : काम आवरून घरी जात असताना पैठण ते बारामती रोडवरील देवीनिमगाव येथील पवणे वस्तीवर कंटनेच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री आठच्या दरम्यान घडली. संदिप विश्वनाथ अनारसे वय वर्ष ४० असे मृताचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील संदिप अनारसे हा तरूण सोमवारी रात्री पावणे आठच्या दरम्यान कड्यावरून घराकडे दुचाकीवरून जात असताना धामणगांव वरून कड्याकडे येत असलेल्या एका मालवाहतूक कंटनेरसोबत समोरासमोर धडक झाली. या अपघातात संदिप गंभीर जखमी झाला. उपचारासाठी अहिल्यानगर येथे घेऊन जात असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके,तुषार मिसळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. मृतदेहावर कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात आई-वडिल,पत्नी,दोन मुल,भाऊ असा परिवार आहे.
एक मिनिट अंतरावर होते घर!
'कड्यावरून निघालोय, दहा मिनिटात घरी येतो!' असे कॉल करून सांगत संदीप दुचाकीवर घराकडे निघाला होता. संदिपचा अपघात घडला तिथून एक मिनिट अंतरावर त्याचे घर होते. अगदी घराजवळ येताच काळाने घाला घातल्याने या घटनेची गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.